भारतीय जनता पार्टी सलग १० वर्षे देशात सत्तेवर आहे. या १० वर्षांच्या काळात भाजपा सरकारने अनेक मोठे आणि धक्कादायक निर्णयही घेतले. नोटबंदी करणे, जीएसटी लागू करणे, जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवणे ही त्यापैकी प्रमुख उदाहरणं. भाजपाने या १० वर्षांत संविधानातही संशोधन केलं. दरम्यान, भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. सत्तास्थापन करण्यासाठी केवळ २७२ जागा (बहुमत) जिंकणं आवश्यक असलं तरी भाजपाने देशभरात ४०० जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे विरोधक भाजपाच्या या निर्धाराबाबत संशय व्यक्त करत आहे. भाजपाला देशाचं संविधान बदलायचं आहे, यंदाची लोकसभा निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल, या निवडणुकीत भाजपाला ४०० जागा मिळाल्या तर देशात हुकूमशाही सुरू होईल, असे वेगवेगळे आरोप विरोधक करत आहेत. या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधानांनी टीव्ही ९ नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.
नरेंद्र मोदी म्हणाले, मी तर संविधानाची पूजा करतो आणि मी संविधानाची सर्वात मोठी सेवा देखील केली आहे. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवून तिथे भारताचं संविधान लागू केलं हीच माझी संविधानाची सर्वात मोठी सेवा आहे. काँग्रेस हे कधीच करू शकली नाही. आपल्या देशात संविधान लागू होऊन ६० वर्षे झाली तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. तेव्हा मी एका मोठ्या हत्तीवर संविधानाची प्रत ठेवली, त्या प्रतीची पूजा केली आणि एक मोठी पदयात्रा काढली. मी किंवा कुठलाही नेता त्या हत्तीवर बसला नाही. आम्ही सगळेजण त्या हत्तीबरोबर पायी चालत होतो. राज्याचा मुख्यमंत्री देखील पायी चालत होता. हे सगळं मी का केलं? तर नागरिकांच्या मनात संविधानाबद्दलचा आदर वाढावा म्हणून केलं.
मी जेव्हा संसदेत आलो, पंतप्रधान झालो, तेव्हा मी संविधान दिन साजरा करण्याचा प्रस्ताव सादर केला. परंतु, त्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केला. संविधान दिनाच्या प्रस्तावाला विरोध करत काँग्रेसवाले म्हणाले, प्रजासत्ताक दिन आहेच की मग वेगळ्या संविधान दिनाची काय गरज आहे? काँग्रेसचे आत्ताचे अध्यक्ष (मल्लिकार्जुन खरगे) तेव्हा असं म्हणाले होते. संविधान खरंतर आपल्या आयुष्याची प्रेरणा व्हायला हवं. म्हणूनच मी नागरिकांना त्याबद्दल सांगत असतो.
हे ही वाचा >> “ते कर्ज मी कधीच विसरू शकत नाही”, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत नरेंद्र मोदींचं वक्तव्य
पंतप्रधान म्हणाले, मी आता माझे पत्ते उलगडतो… माझा पुढचा संकल्प सांगतो… माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात पहिल्या शंभर दिवसात मी एक गोष्ट करणार आहे. आपल्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे येणारं वर्ष धुमधडाक्यात साजरं केलं जाईल. संविधानाच्या पंच्याहत्तरीनिमित्त वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातील. जेणेकरून देशातील जनता आणि आपले विरोधक देखील संविधानाची पवित्रता समजून घेतील, संविधानाचं पवित्र्य आणि महात्म्य समजू शकतील. संविधानातील आपल्या अधिकारांची जशी चर्चा होते, तशीच चर्चा त्यातील कर्तव्यांची देखील व्हायला हवी. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. लोकांमध्ये कर्तव्यभावना जागी व्हावी असं मला वाटतं.