Loksabha Elections Results Modi Effect: मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील एनडीए सरकारला २९३ जागा जिंकता आल्या. यंदा भाजपा व घटक पक्षांचा गट विजयी जरी झाला असला तरी दोन्ही बाजूंमधील विजयी जागांचा फरक हा अगदीच कमी आहे. यामुळे देशभरात मोदींच्या विजयापेक्षा काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांना मिळालेल्या यशाची चर्चा जास्त होतेय. काल, निकालाची चित्र स्पष्ट झाल्यावर नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, “१९६२ नंतर पहिल्यांदाच सरकार तिसऱ्यांदा परतले आहे.” सत्ताधारी आघाडीसाठी मोठा विजय अपेक्षित असल्याचे सांगणाऱ्या एक्झिट पोलच्या अंदाजांच्या विरोधात, भाजपा स्वबळावर बहुमतापासून फार मागे पडला आहे. यंदा सरकार स्थापन करण्यासाठी सुद्धा भाजपाला घटक पक्षांची मदत अत्यंत आवश्यक असेल. हा रडत पडत झालेला विजय जगभरात मोदींच्या प्रतिमेत काही बदल घडवून गेला आहे. अनेक जागतिक नेत्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या असल्या तरी जागतिक प्रसारमाध्यमे मोदी व एनडीएच्या यशाकडे कसे पाहतात हे पाहूया..
‘Indian election delivers stunning setback to Modi and his party’: The Washington Post
भाषांतर: ‘भारतीय निवडणुकीत मोदी आणि त्यांच्या पक्षाला जबरदस्त धक्का’: वॉशिंग्टन पोस्ट
अमेरिकन दैनिक द वॉशिंग्टन पोस्टने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांविषयी “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे अनपेक्षित खंडन” असे संबोधित केले आहे. या निकालांनी दशकातील सर्वात प्रबळ भारतीय नेत्याच्या अजिंक्यतेवर प्रश्न निर्माण केला आहे. अनेक वर्षांनी पहिल्यांदाच मोदी असुरक्षित दिसले असेही या पोस्टमध्ये हायलाईट करण्यात आले आहे.
‘Modi loses parliamentary majority in Indian election’: The Guardian
भाषांतर: ‘भारतीय निवडणुकीत मोदींनी संसदीय बहुमत गमावले’: द गार्डियन
ब्रिटीश दैनिकाने असे नमूद केले की, “… हे स्पष्ट होते की भाजपाने निवडणुकीसाठी केलेली भाकिते खरी झाली नाहीत उलट देशाच्या अनेक भागांमध्ये बलाढ्य पंतप्रधान आणि त्यांच्या हिंदू राष्ट्रवादी राजकारणाला धक्का बसला आहे. मोदींसाठी आजचा निकाल अनपेक्षित धक्का आहे. निवडणूक प्रचारादरम्यानच भाजपा अस्वस्थ असल्याचे दिसत होते. त्यामुळेच कदाचित त्यांनी धार्मिक मुद्द्यांचे ध्रुवीकरण वाढवले. गोठवलेला पक्ष निधी आणि निवडणुकीच्या तयारीत विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याच्या प्रकारामुळे इंडिया आघाडीला यशस्वी होण्यात मदत झाली.
‘India’s Modi claims victory as he heads for reduced majority’: BBC
भाषांतर: ‘मोदींचा विजयाचा दावा पण बहुमताचा आकडा घटला’: BBC
या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान कमी बहुमताकडे जात असल्याचे अधोरेखित करताना, बीबीसीने म्हटले आहे की, “मोदींच्या कार्यकाळातील दशकाबाबत सार्वमत स्पष्ट करणारे आहे. या दरम्यान त्यांनी भारतातील जीवनातील अनेक पैलू बदलले आहेत, त्यामुळे ही एक मोठी अस्वस्थता असेल.”
शिवाय, बीबीसीच्या पत्रकारांनी देशभरातील भाजपच्या कार्यालयातील मनःस्थितीचे “उदासीन” अशा शब्दात वर्णन केले. या अहवालात विरोधी पक्षांनी भाजपाच्या विरुद्ध दिलेल्या लढ्याचाही खास उल्लेख करण्यात आला. भाजपाला प्रतिस्पर्ध्यांनी मोठा लढा दिला काही वेळा याला हिंसक वळण सुद्धा आले होते. अनेकदा यामध्ये पंतप्रधान मोदींना प्रतिस्पर्ध्यांनी फुटीरतावादी असा टॅग लावला होता. मुस्लिमांना राक्षसी बनवण्याचा प्रयत्न मोदींनी केल्याचा आरोप शुद्ध विरोधकांनी केला होता पण हे आरोप मोदींनी फेटाळून लावले.
‘Needing Help to Stay in Power, Modi Loses His Aura of Invincibility’: The New York Times
भाषांतर: सत्तेत राहण्यासाठी मदत लागणार, मोदींवरील अजिंक्यतेचं आभाळ कोसळलं- द न्यूयॉर्क टाइम्स
न्यू यॉर्क टाईम्सने लिहिले की, “अचानक नरेंद्र मोदींभोवतीचं अजिंक्यतेचं आभाळ कोसळलं आहे.” निकालांना “अनपेक्षितपणे चिंताजनक” असे संबोधून NYT ने नमूद केले की “मोदींच्या कार्यकाळातील एक दशकातील ही फार मोठी उलथापालथ आहे. मोदींसाठी, निकालाचे उदारपणे वाचन हे असू शकते की केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रभावामुळेच ते त्यांच्या पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कुप्रसिद्धीवर मात करू शकतात किंवा असे होऊ शकते की, त्यांचा काळजीपूर्वक जोपासलेला ब्रँड आता शिखरावर पोहोचला आहे, आणि आता सत्ताविरोधी भावनेला ते कमी करूच शकत नाहीत, ही स्थिती कधी ना कधी प्रत्येक राजकारण्याच्या बाबत घडतेच”.
‘India election results: A setback for PM Modi?’: DW
‘भारतीय निवडणुकीचे निकाल: पंतप्रधान मोदींना धक्का?’: DW
डॉयचे वेलेने राजकीय शास्त्रज्ञ आणि सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे वरिष्ठ सहकारी, गिल्स व्हर्नियर्स यांनी दावा केला की ही निवडणूक “पंतप्रधानांसाठी वैयक्तिक धक्का” होती. नवीन भाजपसाठी हा अज्ञात प्रदेश आहे, ज्यांना दोन पर्यायांचा सामना करावा लागेल: एकतर राजकीय सलोखा निर्माण करावा किंवा अनियंत्रित राजकीय कारभाराचे सगळे मार्ग बंद करा. पंतप्रधान कोणता मार्ग निवडतील हे भविष्यच सांगेल त्यातून भारताची स्थिती आणि भविष्याचा मार्ग ठरेल.
हे ही वाचा<< Save Constitution: SC-ST राखीव जागांवर भाजपाला फटका, १३१ जागांचे निकाल ठरले निर्णायक; वाचा इंडिया आघाडीचं सूत्र
‘Narendra Modi suffers surprise loss of majority in India election’: The Telegraph
भाषांतर: नरेंद्र मोदी यांनी भारतीय निवडणुकांमध्ये आश्चर्यकारकरित्या बहुमत गमावले- द टेलिग्राफ
द टेलीग्राफने निवडणूक निकालांचा उल्लेख पंतप्रधान मोदींसाठी “बहुमताचा आश्चर्यचकित पराभव” असा केला. भारतीय जनता पक्षाने मागील एक दशकात अनुभवलेला ‘virtual carte blanche’ (एखादा मुद्दा उचलून धरताना अन्य मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणे) हा प्रकट भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडला आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की भाजपच्या विजयी पक्षातील वातावरण “बऱ्यापैकी निःशब्द” होते. यात ब्लूमबर्गच्या एका अहवालावरही प्रकाश टाकण्यात आला, ज्यात विजयाच्या उत्सवाला “२०१९ च्या निवडणुकीपासून एक चिन्हांकित प्रस्थान” असे म्हटले आहे.