२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख (तत्कालीन संयुक्त शिवसेनेचे प्रमुख) उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची तीन दशकांपासूनची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्याबरोबर घेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. परिणामी राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला विरोधी बाकावर बसावं लागलं. मात्र जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटाने भाजपाशी युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना पक्षावर दावा केला. तसेच निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यतादेखील दिली. ४० आमदार असलेल्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर १०५ आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहे. उपमुख्यमंत्रीपदी बसवून भाजपाने देवेंद्र फडणवीसांची पदावनती केल्याचं अनेकांना आवडलं नाही. मात्र ही भाजपाची रणनीती असल्याचं स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक (१०५) जागा जिंकूनही आम्ही मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आहे. भाजपाने हा त्याग केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठी केला आहे. काहींना वाटत होतं की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून आम्ही ही सत्ता मिळवली आहे. सत्ता मिळाल्यावर आम्ही आमचा मुख्यमंत्री नेमू शकलो असतो. आम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री करू शकलो असतो. परंतु आम्ही तसं केलं नाही. कारण आम्हाला राज्यातील जनतेला सांगायचं होतं की आम्हाला मुख्यमंत्रीपदापेक्षा राज्याचं भलं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो, आम्ही स्वतःसाठी जगत नाही, हा संदेश आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवायचा होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत लोकांची सहानुभूती ही आमच्याबरोबर आहे. लोकांना असं वाटतं की इतका मोठा नेता (देवेंद्र फडणवीस) एक यशस्वी मुख्यमंत्री असूनही आज उपमुख्यमंत्रीपदावर बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा एक प्रकारचा त्याग केला आहे. त्यांनी स्वतःचा सन्मान सोडून केवळ महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सगळं केलंय.” नरेंद्र मोदी यांनी नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत यावर सविस्तर भाष्य केलं.
हे ही वाचा >> काँग्रेस लोकांची संपत्ती लुटून मुस्लीम, घुसखोरांमध्ये वाटेल असं का वाटतंय? पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या देशात पश्चिम बंगाल हे राज्य उद्ध्वस्त होतंय. कोलकाता हे शहर एके काळी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं मुख्य केंद्र होतं. परंतु, त्याचादेखील ऱ्हास होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्ये तिथल्या घाणेरड्या राजकारणामुळे, अस्थिरतेमुळे रसातळाला गेली होती. आम्हाला महाराष्ट्राला तशा स्थितीत जाऊ द्यायचं नव्हतं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आम्हाला किंवा कुठल्याही सरकारला देशाचं हित साध्य करायचं असेल तर महाराष्ट्राला अजून मजबूत करून पुढे जावं लागेल. हेच आम्ही राज्यातील जनतेला सांगत आहोत. हाच संदेश आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहोत आणि याला जनतेकडूनही खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.