हावेरी :  खोटी आश्वासने देऊन काँग्रेसने कर्नाटकमध्ये मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे तुष्टीकरणाचे धोरण जनतेने ओळखले असून, काँग्रेस म्हणजेच भ्रष्टाचार असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत सोडले.

काँग्रेसने इतर मागासवर्गीय तसेच लिंगायत समाजाचा अपमान केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.  राज्यातील मतदार भाजपला पुन्हा निवडून देतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. केंद्र व राज्य सरकारने चौफेर विकास केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा तसेच मुख्यमंत्री एस.आर.बोम्मई यांच्यामुळे हावेरीत मोठय़ा प्रमाणात विकास झाल्याचे स्पष्ट केले. रस्ते तसेच रेल्वे व पायाभूत सुविधांची विविध कामे झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या सभेपूर्वी बंगळूरु येथे पंतप्रधानांचा रोड शो झाला.

पवार यांची उद्या निपाणीत सभा

कोल्हापूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे राजीनामानाटय़ रंगल्याने कर्नाटकातील राष्ट्रवादीच्या प्रचारात शिथिलता आली आहे. आता अखेरच्या टप्प्यात पक्षाची बांधाबांध करून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ताकत देण्यासाठी शरद पवार कर्नाटकात दाखल होत आहेत. पक्षाने नऊ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. 

निपाणी मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. खेरीज, फौजिया खान, अमोल मिटकरी, हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार, रोहित पाटील आदींच्या सभा पार पडल्या आहेत. शरद पवार यांची पहिली जाहीर सभा सोमवारी निपाणी येथे होणार आहे.  मुंबईत घडामोडी सुरू असताना प्रचाराचा भार फौजिया खान, अमोल मिटकरी, रोहित पाटील यांनी उचलला होता.  पक्षाने शेवटच्या टप्प्यात निपाणी – उत्तम पाटील, गुलबर्गा – हरी आर, राणेबेन्नूर – आर शंकर या तीन ठिकाणी ताकत केंद्रित केली असल्याचे सांगण्यात आले.

विहिंपची खरगे यांना कायदेशीर नोटीस

नवी दिल्ली काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जारी केलेल्या जाहीरनाम्यात बजरंग दलाविरुद्ध अपमानास्पद शेरेबाजी केल्याचा आरोप करून विश्व हिंदू परिषदेने या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कायदेशीर नोटीस बजावली असून, १०० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे.

विहिंपची चंडीगड शाखा आणि त्यांची युवक शाखा असलेले बजरंग दल यांनी ४ मे रोजी ही नोटीस बजावली असून, १४ दिवसांत भरपाईची मागणी केलीआहे.

आमदार प्रणिती शिंदे यांची सभा बेळगावमध्ये उधळली 

कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाचा फटका काँग्रेसच्या तारांकित प्रचारक आमदार प्रणिती शिंदे यांनाही बसला आहे. बेळगाव येथील त्यांची सभा काल रात्री कार्यकर्त्यांनी उधळून लावली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ भाजप आणि विरोधी काँग्रेस, जनता दल यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार उभे केले आहेत. या सहा मतदारसंघांत महाराष्ट्रातील भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचाराला येऊ नये, असे निवेदन त्यांनी दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना दिले होते. तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी बेळगाव येथे सभा झाली. तेव्हा एकीकरण समितीने त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली होती. या पाठोपाठ आता एकीकरण समितीचा रोष काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या सभेवरही दिसून आला.

भाजपविरोधात एकजूट गरजेची

हुबळी : भाजपच्या जुलमी राजवटीविरोधात एकजूट राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी येथील सभेत केली. भारत जोडो यात्रा ही द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात होती, असे सोनियांनी नमूद केले. भाजपची जुलमी राजवट संपवल्याशिवाय कर्नाटक किंवा देश प्रगती करू शकणार नाही, असे सोनियांनी नमूद केले.

Story img Loader