लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानाचे सहा टप्पे पार पडले असून आता केवळ एका टप्प्यातील मतदान बाकी आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२६ मे) उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथे भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित जनसभेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, समाजवादी पार्टीचा कायदा आणि सुव्यवस्थेशी ३६ चा आकडा आहे. यांचं सरकार असताना पोलीस मोठ्या कष्टाने एखाद्या दहशतवाद्याला पकडायचे, त्यानंतर हे सपावाले त्या दहशतवाद्यांना सोडून देत होते. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने असं करण्यास नकार दिला तर हे लोक त्या अधिकाऱ्याला निलंबित करायचे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या सपावाल्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेश आणि पूर्वांचल भागाला गुन्हेगारांचा अड्डा (तळ) बनवलं होतं. येथील लोकांची जमीन असो अथवा त्यांचं आयुष्य कधी हिरावलं जाईल हे सांगता येत नव्हतं. माफिया आणि गुंडांच्या टोळ्या सपा सरकारची व्होट बँक होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सहा टप्पे पार पडले आहेत. या सहा टप्प्यांमधील मतदानावेळचा लोकांचा कल पाहता त्यांनी भाजपाप्रणित एनडीए सरकारची पुष्टी केली आहे. देशातील जनतेने तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. आमचा देशाच्या विकासाचा हेतू, सरकारची चांगली धोरणं आणि देशभक्ती पाहून लोकांनी पुन्हा एकदा आमचीच निवड केली आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या देशातील जनता इंडी आघाडीवाल्या लोकांना चांगलीच ओळखून आहे. त्यांचे खरे हेतू जनतेला माहिती आहेत. त्यामुळे लोक त्यांचा स्वीकार करणार नाहीत.

हे ही वाचा >> Pune Porsched Accident : “अपघाताची…”, अल्पवयीन मुलाच्या आईने चालकाकडे केली होती विनंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हे सपावाले लोक कट्टर जातीयवादी आहेत. यांच्या पक्षात केवळ घराणेशाही चालते. यांचं सरकार आल्यावर हे लोक सत्तेच्या चाव्या त्यांच्याच कुटुंबातील लोकांच्या हाती देतात. त्यामुळे यांच्यापासून दूर राहा. आपल्या हिंदू परंपरेत ज्येष्ठ महिना खूप खास असतो. या महिन्यातील प्रत्येक मंगळवार खूप पवित्र मानला जातो. या मुहूर्तावर आपण या विरोधकांना कायमचा रामराम करून आपल्या देशात रामराज्य आणूया. उत्तर प्रदेशमधील लहान मुलांनाही राजकारण चांगलंच कळतं. येथील जनता योग्य लोकांची निवड करेल. कुठलीही शहाणी व्यक्ती बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत नाही. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमधील जनता समाजवादी पार्टीचा स्वीकार करणार नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi says samajwadi party never maintained law and order in uttar pradesh asc