Nayab Singh Saini To Become Haryana CM : हरियाणा विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवणारी भारतीय जनता पार्टी आता सत्तास्थापन करणार आहे. येत्या १७ ऑक्टोबर रोजी भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्याबरोबर भाजपाचे इतर काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंचकुला सेक्टर ५ येथे सकाळी १० वाजता हा शपथविधी समारंभ पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.हा शपथविधी १५ ऑक्टोबरला होणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र, आता १७ ऑक्टोबर ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंजुरी मिळाली आहे. येत्या १७ ऑक्टोबर रोजी पंचकुलामध्ये मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचे शपथविधी पार पडतील. अलीकडेच दिल्लीत खट्टर व नायब सिंह सैनी यांची भेट झाली होती. दरम्यान, नायब सिंह सैनी यांच्या शपथविधीसाठी हरियाणा भाजपाने तयारी सुरू केली आहे.
हे ही वाचा >> हेच खरे हिरो! १४१ प्रवाशांना विमानात तांत्रिक बिघाडानंतरही सुखरूप खाली उतरवणाऱ्या वैमानिकांवर कौतुकाचा वर्षाव; पाहा VIDEO!
माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या जागी नायब सिंह सैनी हरियाणाचे मुख्यमंत्री झाले होते. खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. तर, नायब सिंह सैनी मुख्यमंत्री झाल्याने भाजपाची राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. याचा निवडणुकीत भाजपाला फायदा झाला. सैनी हे ओबीसी असल्याने राज्यातील जातीय समीकरणं बदलली. भाजपाने या निवडणुकीत सामाजिक व राजकीय समीकरणांचा योग्य मेळ साधला आणि त्यांना त्याचा निवडणुकीत फायदा झाला.
हे ही वाचा >> इंडिया आघाडीत बिघाडी? उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीसाठी सपा उमेदवारांची यादी जाहीर, काँग्रेसची चर्चा नाही! पुढे काय होणार?
भाजपाने सलग तिसऱ्यांदा हरियाणाचा गड जिंकला
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. ५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर आले होते. जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, हरियाणात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, तर १० वर्षांनंतर काँग्रेस सत्तेत परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, हरियाणा निवडणुकीत भाजपाने मोठी मुसंड मारली. भाजपाने राज्यातील ९० पैकी ४९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. तर काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.