लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने अनेक जागांवर उमेदवार घोषित केलेले नाहीत. काँग्रेस आणि भाजपाने आपल्या वाट्यातील जागा जाहीर केल्या आहेत. मात्र महायुतीमधील राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. तर भाजपामध्येही जाहीर झालेल्या उमेदवारीवरून काहीशी नाराजी असल्याचे दिसत आहे. त्यातच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे आजचे विधान या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते. नाशिक लोकसभेसंदर्भात बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले की, शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळणार आहेत, तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

“नाशिक लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत नाही. माध्यमांनीच माझ्या नावाची चर्चा सुरू केली. नाशिकच्या जागेबाबत महायुतीमध्ये अजून चर्चा सुरू आहे. या मतदारसंघासाठी अनेकजण मुंबईला जाऊन आले. मात्र अद्याप तीनही पक्ष नाशिकच्या जागेवर चर्चा करत आहेत. चर्चेनंतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार दिला, तर आम्ही त्याचे काम करणार”, अशी माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आपल्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा आहे, या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, भुजबळ कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्या असे मी सांगितलं नाही. फक्त शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हाला द्या, अशी मागणी मी केली आहे.

नाशिक जागेचा तिढा; शिंदे गटाविरोधात भाजप आमदारांचे फडणवीस यांना गाऱ्हाणे

शिवसैनिकांना अस्वस्थ होण्याचं कारण नाही

छगन भुजबळ यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले गेले. याबद्दल भुजबळ यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे नगर विकास खात्याची जबाबदारी आहे. त्या खात्याशी निगडित माझे काम होते, त्यासाठी मी त्यांची भेट घेतली. शिवसैनिकांनी यावरून अस्वस्थ होण्याची काही आवश्यकता नाही. मी तुमच्यातूनच इथपर्यंत आलो आहे. मुख्यमंत्र्यांकडे अनेक खाती आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जावंच लागतं. माझी भेट पाचच मिनिटांत संपली. राजकारणाचा विषय असेल तर तास-तासभर बैठक झाली असती, असे सांगून भुजबळ यांनी मिश्किल टिप्पणीही केली.

साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मतदारसंघ मिळावा हा प्रत्येक पक्षाचा दावा

नाशिकचा मतदारसंघ मिळावा. यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. त्यात काही गैर नाही. नाशिकचा मतदारसंघ जर आम्हाला मिळाल, त्यानंतर तिथे कोण उमेदवार द्यायचा, हे ठरविले जाईल, असे उत्तर भुजबळ यांनी दिले. मनसे महायुतीत सामील झाल्यामुळे आमच्यात कोणताही पेचप्रसंग निर्माण झालेला नाही. मनसेमुळं महायुतीची शक्ती नक्कीच वाढणार आहे. मनसेचे नेते पोक्त आहेत. त्यांना काय हवे आणि काय नको, हे त्यांना योग्यपद्धतीने माहिती आहे. त्यामुळे मनसेचे नेते आणि वरच्या पातळीवरील नेते आपसात चर्चा करून निर्णय घेतील, असेही भुजबळ म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar faction leader chhagan bhujbal demands lok sabha seats as many seats as the shinde group kvg