महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. नाशिक मतदारसंघाबाबत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या तिनही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. तसेच नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे नाव या मतदारसंघामधून चर्चेत आले होते. मात्र, त्यानंतर छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे नाशिकमधून कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अशातच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका सभेत बोलताना एक सूचक विधन केलं. “प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभी करेन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत त्यांना एक सल्ला दिला आहे.
हेही वाचा : पंकजा मुंडे यांचं प्रीतम मुंडे यांच्याबाबत मोठं विधान; म्हणाल्या, “नाशिकमधून…”
छगन भुजबळ काय म्हणाले?
“त्यांनी (पंकजा मुंडे यांनी) बीडच्या निवडणुकीकडे लक्ष द्यावे. त्या निवडून येणं महत्वाचं आहे. तिकडे त्यांनी पूर्ण प्रयत्न करावे. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत अशी अडचण नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहेत हीच अडचण आहे. तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. सर्वांना बरोबर घ्या. कुठल्याही परिस्थितीत निवडून या”, असा सल्ला छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांना दिला.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?
बीडमध्ये झालेल्या सभेत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, “प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी हा शब्द दिला होता. मला तिकीट देऊ नका, असं म्हणून मी सगळीकडे गेले होते. मात्र, मला हे आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची आहे. ताईचं (प्रीतम मुंडे) कुठेही अडणार नाही. त्यांना मी नाशिकमधून उभे करेल, तुम्ही काळजी करू नका,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.