NCP Sharad Pawar Third Candidate List : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2024) जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये ९ जणांची उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
कोणाला कोठून मिळाली संधी?
वाशिममधील कारंजा-ज्ञायक पाटणी, हिंगणघाट-अतुल वांदिले, नागपूरमधील हिंगणा-रमेश बंग, अणुशक्तीनगर-फहद अहमद, चिंचवड-राहुल कलाटे, भोसरी-अजित गव्हाणे, माजलगाव-मोहन जगताप, परळी-राजेसाहेब देशमुख, मोहोळ-सिद्धी रमेश कदम यांच्यासह आदी जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख
परळी विधानसभा मतदारसंघात (Parli Vidhansabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होणार आहे.
कोणाला कोठून मिळाली उमेदवारी? वाचा यादी!
क्र. | विधानसभा मतदारसंघ | उमेदवाराचे नाव |
१ | कारंजा | ज्ञायक पाटणी |
२ | हिंगणघाट | अतुल वांदिले |
३ | हिंगणा | रमेश बंग |
४ | अणुशक्तीनगर | फहद अहमद |
५ | चिंचवड | राहुल कलाटे |
६ | भोसरी | अजित गव्हाणे |
७ | माजलगाव | मोहन जगताप |
८ | परळी | राजेसाहेब देशमुख |
९ | मोहोळ | सिद्धी रमेश कदम |
जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ज्या जागा आल्या आहेत. त्यातील एकूण उमेदवारांपैकी आम्ही आमच्या यादीत एकूण ११ महिलांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आम्हाला याचा आनंद आहे. लाडकी बहीण म्हणून आम्ही फक्त घोषणा करत नाहीत तर आम्ही कृती देखील करतो. आमच्या पक्षाला ज्या जागा उपलब्ध झाल्या, त्यामध्ये आम्ही ११ महिलांना उमेदवारी दिली”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.