Shiv Sena vs NCP MLAs: राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून, यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीचा (अजित पवार) समावेश असलेल्या महायुतीने दमदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन खलबतं सुरू आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांच्या आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशात कर्जत-खालापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचे हे आरोप फेटाळून लावत, श्रीवर्धनच्या आमदार आणि सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी पलटवार केला आहे. “महेंद्र थोरवे काठावर वाचले आहेत, त्यांनी विजयाची हवा डोक्यात जाऊ देऊ नये,” असे म्हटले आहे.

महेंद्र थोरवेंचे आरोप

कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, “आपण पाहताय किती अदृश्य माझ्या विरोधात काम करत होत्या. महायुतीत असूनही त्यांनी मला पाडण्याा डाव मांडला होता. पण, हा डाव निष्ठावंत शिवसैनिकांनी उलटून लावलेला आहे. आज माझ्या विजय होत असताना या मतदासंघातून सुनील तटकरेंचा पराभव झालेला आहे.”

अदिती तटकरेंचे प्रत्युत्तर

महेंद्र थोरवे यांच्या या आरोपांना सुनील तटकरे यांच्या कन्या आणि श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदिती तटकरे म्हणाल्या, “मी महेंद्र थोरवे यांना जास्त महत्त्व देत नाही. ते काठावर वाचले आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा त्यांचा मतदारसंघ सांभाळावा. यश मिळाले म्हणून त्याची हवा काही डोक्यात जाऊ द्यायची नसते. उलट नम्रतेने त्याचा स्वीकार करायचा असतो.”

हे ही वाचा : “बिहार पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, कारण…”, फडणवीसच मुख्यमंत्री होणार यावर जोर देत प्रवक्ते म्हणाले…

महायुतीला मोठे यश

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता. त्यानंतर राज्यातील वातावरण विरोधात असूनही, महायुतीने राज्यात सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. यामध्ये महायुतीने २३५ जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजपाने तब्बल १३२, शिवसेनेने (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या. दुसरीकडे महाविका आघाडीच्या वाट्याला अवघ्या ४९ जागाच आल्या. यामध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादीने (शरद पवार) १० जागा जिंकल्या. तर, महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या वाट्याला ३ जागा आल्या.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leaders ajit pawar sunil tatkare aditi tatkare and mahendra thorave shivsena eknath shinde aam