बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. तसेच रोहित पवार यांनी काही व्हिडीओ एक्स (ट्विटर) अकाउंटवर शेअर करत टीका केली आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची आई आशा पवार यांच्यासमवेत मतदान केले. तसेच माझी आई माझ्याबरोबर असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यावर आता रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. “एखाद्याला मतदानाच्या दिवशीच आई कशी आठवते?”, असा सवाल रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सर्व बूथच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ज्या काही अडचणी आल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघात १५५ संवेदनशील मतदारसंघ आहेत, याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे. आतापर्यंत पैसे वाटपाच्या १८ तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. मारहाण आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न अशा ८ तक्रारी आल्या आहेत. यामधील बहुतेक तक्रारी बारामती विधानसभा मतदारसंघातीलच आहेत. त्यामुळे याचा अर्थ अजित पवार यांनी फक्त बारामतीवर लक्ष ठेवले आहे”, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
हेही वाचा : अजित पवार यांनी शरद पवारांच्या आरोपांना दिलं उत्तर, “मी जर इतका भ्रष्टाचारी, नालायक आणि…”
दत्तात्रय भरणे यांच्याबातत रोहित पवार म्हणाले, “त्यांची भाषा असंवैधानिक अशा प्रकारची आहे. त्यांनी कार्यकर्त्याला वापरलेल्या भाषेला गुंडागर्दी म्हणतात. तुम्ही सत्तेत असाल आणि अशी मगरूरी करत असाल तर हे खपवून घेतले जाणार नाही. याबाबत आम्ही तक्रार दाखल केली आहे”, असा इशारा रोहित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना दिला.
सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी
बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे या अचानाक अजित पवार यांच्या काटेवाडी येथील घरी जाऊन अजित पवारांच्या आईंची भेट त्यांनी घेतली होती. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सुप्रिया सुळे या काकीला भेटायला गेल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्याकडे भावना आहेत. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतलेली असली तरी त्यामध्ये काकीची काही चुकी नाही. सुप्रिया सुळे यांनी राजकीय संस्कृती जपली आहे”, असे भाष्य रोहित पवारांनी केले.
रोहित पवारांचा अजित पवारांना टोला
“गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे रडण्याची अॅक्टिंग करत आहेत. आता निवडणुकीच्या दिवशी कोणाला आई आठवत असेल आणि चित्रपटातील विधानं कोणी करत असेल तर तो त्यांचा त्यांचा विषय आहे”, असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला.