राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या ११ लोकसभा मतदारसंघापैकी बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमध्ये सामना होत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे नेते आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडीओ ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये दत्तात्रय भरणे हे शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित पवारांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

“केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडीओत बघा. विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही”, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : “मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजाने…”, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, “एका गृहिणीला…”

रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये काय?

रोहित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांचा व्हिडीओ ट्विट केला असून या व्हिडीओमध्ये दत्तात्रय भरणे हे एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या व्हिडीओ संदर्भात अद्याप दत्तात्रय भरणे यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, रोहित पवारांनी’ टिव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले, “दत्तात्रय भरणे यांनी अतिशय खालच्या स्थराची भाषा वापरली आहे. ते यामध्ये आमच्या एका बूथ कार्यकर्त्याला बोलत आहेत. भरणे यांच्या भावकीमधूनच आमचे काही बूथ कार्यकर्ते आहेत. त्यांच्याविरोधात ते बोलत आहेत. याआधीही मी वेल्हे येथील एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यामध्ये त्याने गुंडागर्दी केली होती. बारामतीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. काही ठिकाणी बूथ ताब्यात घेण्याचा प्रकार झाला. त्यामुळे हे जे सुरू आहे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. त्यांची आता चिडचिड सुरु आहे. ती चिडचिडच खूप काही सांगून जात आहे. आम्ही फक्त आरोप केले नाही तर थेट पुरावे दिले आहेत”, असे रोहित पवार म्हणाले.