येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रात मतदान होणाऱ्या काही चर्चेतल्या मतदारसंघांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीत असून दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या काही दिवस आधी दोन्ही उमेदवारांमध्ये प्रचारामध्ये सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलेल्या आव्हानाला अमोल कोल्हेंनी व्हिडीओ जारी करत उत्तर दिलं असून शब्दाला जागण्याचं आवाहन केलं आहे!
नेमकं काय होतं आव्हान?
खासदार अमोल कोल्हेंनी व्हिडीओमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एका भाषणादरम्यान त्यांना दिलेल्या या आव्हानाचा उल्लेख केला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वैयक्तिक फायद्यासाठी संसदेत खासदार म्हणून प्रश्न विचारले असा मुद्दा अमोल कोल्हेंनी उपस्थित केला होता. त्यावर आढळराव पाटलांनी उत्तर देताना पुरावे दिले तर उमेदवारी मागे घेईन, असं प्रतिआव्हान दिलं होतं. त्यासंदर्भात आता अमोल कोल्हेंनी या व्हिडीओमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांची कागदपत्रच सादर केली आहेत.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
“शिवाजीराव आढळराव पाटलांनी मला काल एक आव्हान दिलं होतं. शिरूर मतदारसंघातल्या जनतेनं १५ वर्षं शिरुरचे प्रश्न मांडण्यासाठी ज्यांना निवडून दिलं त्यांनी कदाचित आपल्या कंपनीचं उखळ पांढरं होण्यासाठी संरक्षण खात्याविषयीच जास्तीत जास्त प्रश्न मांडले का असा माझा प्रश्न होता. ते म्हणाले की याचा पुरावा दाखवा, मी निवडणूक सोडून देतो. त्याचाच पुरावा घेऊन आलोय”, असं म्हणत अमोल कोल्हेंनी कागदपत्रांचा एक गठ्ठाच व्हिडीओमध्ये दाखवला आहे.
या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हेंनी ७ एप्रिल २०१७ आणि १३ फेब्रुवारी २०१९ रोजी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संसदेत संरक्षण खात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची माहिती कागदपत्रांमधून वाचून दाखवली. तसेच, अजूनही बरीच कागदपत्र असून त्यावर आढळराव पाटील यांना उत्तर द्यावं लागेल, असं अमोल कोल्हे म्हणाले.
“जर आढळराव पाटील शब्दाचे पक्के असतील तर त्यांनी शिरूरच्या जनतेला याचं उत्तर देणं आवश्यक आहे. १५ वर्षांत एकही मोठा प्रकल्प शिरूरला आला नाही. पण त्यांनी विचारलेल्या युद्धसाहित्यासंदर्भातल्या प्रश्नांमधून कोणता प्रकल्प आला? संरक्षण खात्यासंदर्भात त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले. या सगळ्याचं उत्तर त्यांनी द्यावं”, असं अमोल कोल्हे म्हणाले. “मी पुरावे दिले आहेत, आता तुम्ही म्हणालात तसे शब्दाला पक्के आहात का? निवडणुकीतून माघार घेणार का?” असा सवालही अमोक कोल्हेंनी केला आहे.
पोस्टमध्ये दिलं आव्हान!
दरम्यान, अमोल कोल्हेंनी एक्सवर व्हिडीओसोबत केलेल्या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांना माफी मागण्याचाही सल्लादिला आहे. “डमी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील दादा, हा घ्या पुरावा! आता शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्याच त्यासोबतच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या ज्या मायबाप जनतेनं तुम्हाला १५ वर्षं संधी दिली, त्यांची माफी जरूर मागा”, असं या पोस्टमध्ये अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.