NCP Sharad Pawar All Women Candidates List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. दरम्यान, आज (२७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीद्वारे त्यांनी नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. शरद पवारांच्या पक्षाने यापू्र्वी दोन याद्या जाहीर केल्या आहेत. यापैकी पहिल्या यादीत ४५ तर दुसऱ्या यादीद्वारे २२ उमेदवार जाहीर केले होते. तिन्ही याद्यांद्वारे त्यांनी आतापर्यत ७६ उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच त्यांनी अनेक महिला उमेदवारांना देखील संधी दिली आहे. यावरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीला चिमटा देखील काढला.

जयंत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ज्या जागा आल्या आहेत. त्यातील एकूण उमेदवारांपैकी आम्ही आमच्या यादीत एकूण ११ महिलांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आम्हाला याचा आनंद आहे. लाडकी बहीण म्हणून आम्ही फक्त घोषणा करत नाही, तर आम्ही कृती देखील करतो. आमच्या पक्षाला ज्या जागा उपलब्ध झाल्या, त्यामध्ये आम्ही ११ महिलांना उमेदवारी दिली आहे” राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सादर करून राज्यभर तिचा प्रचार केला जात असतानाच शरद पवारांच्या पक्षाने ११ महिलांना उमेदवारी देत आम्ही महिलांचा अधिक विचार करतो असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा >> “शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी…”, शिवसैनिकांचा गंभीर आरोप; म्हणाले, “मविआचा प्रचार करणार नाही”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला उमेदवार खालीलप्रमाणे

क्र.मतदारसंघउमेदवाराचे नाव
1मुक्ताईनगररोहिणी खडसे
2अहेरीभाग्यश्री अत्राम
3घाटकोपर (पूर्व)राखी जाधव
4पारनेरराणी लंके
5आर्वीमयुरा काळे
6बागलानदीपिका चव्हाण
7दिंडोरीसुनीताताई चारोस्कर
8पिंपरीसुुलक्षणा शीलवंत
9पर्वतीअश्विनीताई कदम
10चंदगडनंदिनीताई भाबुळकर कुपेकर
11मोहोळसिद्धी रमेश कदम

धनंजय मुंडे विरुद्ध तगडा उमेदवार

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होणार आहे.

हे ही वाचा >> Shivsena : महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरेंच्या शिवसेनेचा शरद पवारांना धक्का; पुण्यात बंडखोरी करणार! उमेदवारही ठरले?

भूम-परांडा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राहुल मोटे यांनी २००४, २००९ आणि २०१४ साली असा सलग तीनवेळा विजय मिळवला होता. मात्र २०१९ साली शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे शिवसेना पक्षाने याठिकाणी पहिल्याच यादीत राहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे राहुल मोटे यांचे समर्थक नाराज होते. राष्ट्रवादीने (शरद पवार) दुसरी यादी जाहीर करताना राहुल मोटे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे.

Story img Loader