देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आहे. प्रचाराच्या भाषणात राजकीय नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत. आज महाविकास आघाडीची सासवडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहून चिंता वाटते”, असे शरद पवारांनी यावेळी म्हटले.
शरद पवार काय म्हणाले?
“या लोकसभेची निवडणूक वेगळी निवडणूक आहे. हा देश कोणत्या पद्धतीने चालवायचा हा प्रश्न या निवडणुकीचा आहे. आज नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. देश चालण्याचा अर्थ हा लोकशाहीच्या मार्गाने, लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीने देशाचा कारभार करणे ही लोकशाहीची गरज आहे. आज काय चित्र दिसते. स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे. पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आहेत का? जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत का? नगर पालिकेच्या निवडणुका झाल्या का? किती दिवसांपासून या निवडणुका झाल्या नाहीत. या संस्था किती दिवसांपासून मोकळ्या आहेत. दोन वर्ष झाले आहेत. दोन वर्ष तुम्ही निवडणुका घेणार नसाल आणि येथून सुरुवात करणार असाल तर आणखी काही दिवसांनी कदाचित विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका न घेण्याची दुर्बुद्धी या राज्यकर्त्यांना सुचण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते चित्र आता दिसत आहे”, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदी सांगतात ४०० से पार. पण ४०० से पार कशासाठी? याचा अर्थ असा आहे की, त्यांना हव्या त्या पद्धतीने कायदे करता यावे. हवे तसे कायदे करण्यासाठी लागणाऱ्या खासदारांची सख्या त्यांना हवी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेत त्यांना बदल करायचे आहेत. यावरुन त्यांच्यावर टीका झाली तर ते सांगतात संविधान बदलण्याचा विचार आमच्या मनात नाही. मी याबाबत एक उदाहरण सांगतो. कर्नाटकाकील एका भाजपाच्या खासदारांनी भाषण करताना सांगितले की, मोदींना या देशाची घटना बदलायची आहे, ती बदलायाची असेल तर कमीत कमी ४०० खासदारांची अवश्यकता आहे. भाजपाचे तीन, चार खासदार हे सांगत आहेत. त्यामुळे देशावर उद्याचे संकट काय असेल? याची प्रचिती आपल्याला यातून येते. त्यामुळे या निवडणुकीकडे अधिक लक्ष देणं गरजेचं”, असे शरद पवार म्हणाले.
“नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जातात आणि आम्हा लोकांची आढवण काढतात. टिका टिप्पणी करतात. आता पुण्यातही येणार आहेत. तुम्ही त्यांचे भाषण ऐका. आले की ते म्हणतील, पुणेकरांना माझा नमस्कार. त्यानंतर थोडं काही बोलले की मग शरद पवार किंवा आणखी कोणावर बोलतील. एक दिवस दिल्लीत मोदींनी भाषण केलं आणि सांगितलं, देशामध्ये शेतीच्या कामात शरद पवारांनी क्रांती केली. त्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये भाषण केलं. तेव्हा म्हणाले, शरद पवार यांचे बोट धरुन राजकारणात आलो. यानंतर आता निवडणुकीच्या प्रचारात आले आणि म्हणाले, यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी जे करता येईल ते करा. लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे, पण ते सातत्याने भूमिका बदलत आहेत”, अशी टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
“सध्या नरेंद्र मोदी भष्ट्राचाराबाबत बोलत आहेत. भोपाळमध्ये ते म्हणाले होते, महाराष्ट्राच्या सहकारी बँकेमध्ये घोटाळा झाला, पाण्याच्या योजनेमध्ये घोटाळा झाला. आता नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यावर आरोप केले, आज ते लोक कुठे आहेत, याची तपासणी केली तर तुम्हाला कळेल”, असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला.