Net Worth Of Parvesh Verma Who defeated Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चमकदार कामगिरी केली आहे. एकूण ७० विधानसभा जागांपैकी भाजपने ३७ जागा जिंकल्या असून, १३ जागांवर ते आघाडीवर आहेत. म्हणजेच भाजप एकूण ५० जागांवर वर्चस्व गाजवत आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने १७ जागा जिंकल्या असून, ते ३ जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच आम आदमी पक्ष एकूण २० जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि इतरांच्या खात्यात अद्याप एकही जागा आलेली नाही.
दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय जनता पक्ष तब्बल २६ वर्षांनी दिल्लीत पुन्हा सत्तेत येणार आहे. या निवडणुकीत भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी तीन वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेल्या अरविंद केजरीवा यांचा परभव केला आहे. यानंतर देशभरात प्रवेश वर्मा यांच्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर अनेकजणांना त्यांची संपत्ती किती आहे, यातही रस निर्माण झाला आहे.
प्रवेश वर्मा ठरले जायन्ट किलर
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागायला सुरुवात झाल्यानंतर देशभरात प्रवेश वर्मा यांची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून पराभव केला आहे. विशेष म्हणजे केजरीवाल हे तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ४७ वर्षीय प्रवेश वर्मा हे पदव्युत्तर पदवीधर आहेत. निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. दिल्लीत जन्मलेले प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. प्रवेश वर्मा यांनी दिल्ली विद्यापीठातून बी.कॉम. केले आहे. याशिवाय त्यांनी ग्लोबल ट्रेडमध्ये एमबीए देखील केले आहे.
किती आहे प्रवेश वर्मांची संपत्ती?
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी शपथपत्रानुसार, प्रवेश वर्मा यांनी ८९ कोटी रुपयांची वैयक्तिक संपत्ती घोषित केली आहे. तर त्यांची पत्नी स्वाती सिंह यांच्याकडे २४.४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या दोघांची एकत्रित संपत्ती ११३ कोटी रुपये आहे. वर्मा यांनी जाहीर केलेल्या आर्थिक माहितीनुसार, त्यांच्याकडे २.२ लाख रुपये रोख आहेत. ५२.७५ कोटी रुपयांची इक्विटी आणि शेअर बाजारातील गुंतवणूक आहे. याचबरोबर त्यांनी १७ लाख रुपयांची विमा गुंतवणूक देखील केली आहे. तर, स्वाती सिंह यांच्याकडे ५.५ लाख रुपयांच्या विमा पॉलिसी आहेत.
या सर्वांबरोबर प्रवेश वर्मा यांच्याकडे अनेक गाड्याही आहेत. यामध्ये टोयोटा फॉर्च्युनर, टोयोटा इनोव्हा आणि महिंद्रा एक्सयूव्ही यांचा समावेश आहे. तसेच, त्यांच्याकडे ८.२५ लाख रुपये किमतीचे सोने देखील आहे.