भारतातील सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीने शिरकाव केलेला आहे. अगदी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षापासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंत घराणेशाही व्यापली आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली, त्याचा निकालही लागला. विधानसभेत निवडून आलेले अनेक आमदार घराणेशाहीशी संबंधित आहेत. आकडेवारीवरून असे दिसते की, पाच आमदारांच्या मागे एक आमदार घराणेशाहीशी निगडित आहे. या आमदारांच्या घरातील एकतरी सदस्य याआधी आमदार, खासदार किंवा राजकारणातल्या एखाद्या महत्त्वाच्या पदावर राहिलेला आहे. भाजपा, काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या तीन पक्षांतील घराणेशाहीशी संबंधित एकूण ६१ उमेदवारांनी निवडणूक लढविली. तीन बाप-लेकाच्या आणि दोन बाप-लेकीच्या जोड्या आहेत. पाच जोड्या दोन भावांच्या आहेत. यांपैकी ४३ उमेदवारांनी विजय मिळवला. दोन अपक्ष निवडून आले आहेत, त्यांच्यातही कौटुंबिक संबंध आहेत.
घराणेशाहीशी संबंधित काही उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यात विशेषतः माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखील हा जेडीएसच्या तिकिटावर रामनगर येथून निवडणूक लढवत होता. काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांचा पुत्र निवेदिथ अल्वा याचा कारवार येथून पराभव झाला.
विधान परिषदेचे आमदार आणि विरोधी पक्षनेते बि. के. हरिप्रसाद यांचा भाचा रक्षित शिवराम हा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेलतानगडी या मतदारसंघातून पराभूत झाला. भाजपा खासदार संगन्ना कराडी यांची सून मंजुळा अमरेश कलबुर्गी जिल्ह्यातील कोप्पळ या मतदारसंघातून पराभूत झाली. तसेच माजी मंत्री आनंद सिंह यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह हा बल्लारी जिल्ह्यातील विजयनगर मतदारसंघातून पराभूत झाला.
बाप-लेकाच्या दोन जोड्या
विधानसभेत बाप-लेकाच्या दोन जोड्या निवडून आल्या आहेत. शमुनुरू शिवशंकरप्पा आणि त्यांचे पुत्र एस. एस. मल्लिकार्जुन हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. तर जीटी देवेगौडा आणि पुत्र हरिश गौडा हे जेडीएसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. शिवशंकरप्पा आणि मल्लिकार्जुन हे दावणगेरे दक्षिण आणि दावणगेरे उत्तर या दोन मतदारसंघांतून निवडून आले आहेत. तर देवेगौडा आणि हरिश हे म्हैसूर जिल्ह्यातील चांमुडेश्वरी आणि हुन्सुर येथून निवडून आले आहेत.
माजी केंद्रीय मंत्री के. एच. मुनियप्पा आणि त्यांची मुलगी रूपकला एम. हे दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर देवनहळ्ळी (बंगळुरू ग्रामीण) आणि कोलार गोल्ड फील्ड या मतदारसंघातून निवडून आले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तीनही जारकीहोळी बंधू आजूबाजूच्या मतदारसंघांतून निवडून आले आहेत. कर्नाटक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सतीश जारकीहोळी हे येमकानमार्डी मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांचे भाऊ रमेश आणि भालचंद्र यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. गोकाक मतदारसंघातून रमेश सातव्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. तर भालचंद्र यांनी अराभावी येथून सहाव्यांदा विजय मिळवला.
कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी शिग्गांव मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियंक खरगे यांनी कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. माजी मुख्यमंत्री धरम सिंह यांची दोन मुले या वेळी निवडणुकीसाठी उभी होती. कलबुर्गी जिल्ह्यातील जवरगी मतदारसंघातून अजय सिंह यांचा विजय झाला, तर बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण मतदारसंघातून विजय सिंह यांचा पराभव झाला आहे. दोघांनीही काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.
माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे पुत्र मधु बंगारप्पा आणि कुमार बंगारप्पा हे दोघेही भाऊ एकमेकांविरोधात शिवमोग्गा जिल्ह्यातील सोराब मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते. यांपैकी भाजपाच्या तिकिटावर लढणाऱ्या ए. बंगारप्पा यांचा काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेल्या मधु बंगारप्पा यांनी पराभव केला. माजी मंत्री सी. मोताम्मा यांची मुलगी असलेली नयना झावर यांनी मुदीगेरे मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला.
काँग्रेस पक्षाचे घराणेशाहीशी संबंधित विजयी उमेदवार
दिनेश गुंडू राव, माजी मुख्यमंत्री आर. गुंडू राव यांचे पुत्र – गांधीनगरमधून विजयी
गणेश हुक्केरी, माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांचे पुत्र – चिक्कोडी-सादलगामधून विजयी
महंतेश कौजालगी, माजी मंत्री शिवानंद कौजालगी यांचे पुत्र – बैलहोंगल येथून विजयी
विजयनाद ए कशाप्पनवर, माजी मंत्री एस. आर. कशाप्पनवर यांचे पुत्र – हुनगुंद येथून विजयी
कनीझ फातिमा, माजी मंत्री कमर उल इस्लाम यांच्या पत्नी – उत्तर गुलबर्गामधून विजयी
ईश्वर खंद्रे, माजी मंत्री भीमन्ना खंद्रे यांचे पुत्र – भालकी येथून विजयी
क्रिष्णा बेयरगौडा, माजी मंत्री सी. बेअरगौडा यांचे पुत्र – बैतारायण्णापुर येथून विजयी
शरथ बचेगौडा, भाजपाचे खासदार बी. एन. बचेगौडा यांचे पुत्र – होसाकोटे येथून विजयी
यू. टी. खदीर, माजी आमदार यू .टी. फरीद यांचे पुत्र – मंगुळुरू येथून विजयी
ए. एस. पोनन्ना, माजी आमदार ए. के. सुबैह्या यांचे पुत्र – विराजपेट येथून विजयी
दर्शन ध्रुवनाराययण, माजी खासदार आर. ध्रुवनारायण यांचे पुत्र – नंजनगुड येथून विजयी
एच. एम. गणेश प्रसाद, माजी मंत्री एच. एस. महादेव प्रसाद यांचे पुत्र – गुंडुलपेटमधून विजयी
एम. बी. पाटील, माजी आमदार बी. एम. पाटील यांचे पुत्र – बाबलेश्वरमधून विजयी
एच. के. पाटील, माजी मंत्री के.एच. पाटील यांचे पुत्र – गदग येथून विजयी
अनिल कुमारसी, माजी आमदार चिक्कामदू एस. यांचे पुत्र – एच डी कोटे येथून विजयी
तनवीर सैत, माजी मंत्री अनीज सैत यांचे पुत्र – नरसिंहराज मतदारसंघातून विजयी
नयना झावर, माजी मंत्री मोतम्मा यांच्या सुपुत्री – मुदिगेरे येथून विजयी
भाजपा पक्षाचे घराणेशाहीशी संबंधित विजयी उमेदवार
बी. वाय. विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे सुपुत्र – शिकारीपुरा येथून विजयी.
शशिकला जोले, चिक्कोडीचे खासदार अन्नासाहेब जोले यांच्या पत्नी – निपाणी येथून विजयी
निखिल कट्टी, माजी मंत्री उमेश कट्टी यांचे पुत्र – हुक्केरी येथून विजयी
अविनाश जाधव, कलबुर्गीचे खासदार उमेश जाधव यांचे सुपुत्र – चिंचोली येथून विजयी
अरविंद बेल्लड, माजी आमदार चंद्रकांत बेल्लड यांचे पुत्र – हुबळी-धारवाड पश्चिम येथून विजयी
एल. ए. रवीसुब्रमह्मण्य, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे काका – बसवनगुडी मतदारसंघातून विजयी
मंजुळा एस., माजी भाजपा आमदार अरविंद लिंबावेली यांच्या पत्नी आणि आमदार एस. रघु यांच्या भगिनी – महादेवपुरा या मतदारसंघातून विजयी
जी. बी. ज्योती गणेश, भाजपा माजी खासदार जी. एस. बसवराजू यांचे पुत्र, तुमकूर मतदारसंघातून विजयी