Nitin Gadkari on Batenge to Katenge by Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत. ते भाजपाचे या निवडणुकीतील स्टार प्रचारक आहेत. भाजपाचे हे प्रचारक वेगवेगळी वक्तव्ये व घोषणा करून प्रसारमाध्यमं व लोकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. या प्रचारादरम्यान त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत हिंदू समुदायाला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यांच्यानंतर इतर भाजपा नेत्यांनी व शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी देखील योगींचा हा नारा उचलून धरला. मात्र, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) या घोषणेपासून आंतर राखलं आहे. या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी ते व त्यांचा पक्ष या घोषणेशी सहमत नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन घोषणा दिली. ‘एक हैं तो सेफ हैं’असा नारा मोदींनी दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या या दोन्ही घोषणांची चर्चा चालू आहे.
दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचीना या दोन्ही घोषणांबाबत भूमिका विचारली असता त्यांनी सांगितलं की “मी याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वाच्या व्याख्येतून बघतो”. तसेच निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाप्रणित महायुती सरकारने केलेली कामं पुरेशी असल्याचं त्यांनी नमूद केलं. गडकरी यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर सविस्तर भाष्य केलं.
हे ही वाचा >> “शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…
‘बटेंगे तो कटेंगे’बाबत गडकरींकडून भूमिका स्पष्ट
नितीन गडकरी यांना विचारण्यात आलं होतं की ‘बटेंगे तो कटेंगे ’, ‘एक है तो सेफ है’ या घोषणांकडे तुम्ही कसे बघता? यावर ते म्हणाले, “निवडणुकीच्या काळात प्रत्येकाची प्रचाराची एक पद्धत असते. त्यातून या घोषणा दिल्या जात असाव्यात. मी मात्र याकडे संघाच्या हिंदुत्वाच्या व्याख्येतून बघतो. ही व्याख्या सर्व भारतीयांना सामावून घेणारी आहे. भारतीयत्वाशी जोडणारी आहे. यात जात, धर्म, पंथ भेदाला स्थान नाही. अलीकडे आपल्याला शेजारी राष्ट्रांकडून धोका वाढला आहे. पाकिस्तानचे दहशतवादी भारतात येतात, हल्ले करतात. बांगलादेशचे घुसखोर येतात. या सर्वांपासून सावध राहण्यासाठी संपूर्ण भारतीयांनी एक होणे गरजेचे आहे. कदाचित त्यातून ही घोषणा जन्माला आली असावी. मीसुद्धा त्याकडे याच दृष्टिकोनातून बघतो”.
हे ही वाचा >> ‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाप्रणित महायुती सरकारने केलेली कामं पुरेशी : गडकरी
नितीन गडकरी म्हणाले, घोषणांच्या गरजेविषयी मी बोलणे योग्य नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि व्यक्तीही वेगवेगळे असतात. विकासाचे म्हणाल तर गेल्या दहा वर्षांत आमच्या सरकारने देश व राज्याचा भरपूर विकास केला आहे. आणि त्याच आधारावर यावेळची निवडणूक आम्ही जिंकू. हा एकच मुद्दा यश मिळवण्यासाठी पुरेसा आहे असे मला वाटते.