लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीए की इंडिया आघाडी? यावर बरीच चर्चा पाहायला मिळाली. अखेर एनडीएकडे स्पष्ट बहुमत असताना इंडिया आघाडीनं ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यायचं जाहीर केलं. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि ९ जून रोजी पुन्हा पदाची शपथ घेण्याचंही निश्चित झालं. पण आता केंद्रातील मंत्रीपदांसाठीची चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. २०१४ आणि २०१९ प्रमाणे भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. त्यामुळे एनडीएतील मित्रपक्षांवर भिस्त ठेवूनच मोदींच्या तिसऱ्या टर्मचा कारभार चालणार आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार तीन मंत्रीपदांची मागणी करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत अवघ्या २४० जागांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे पक्षाला यंदा तब्बल ६३ जागांचा फटका बसला आहे. त्यामुळे एनडीएमध्ये भाजपाची मोठी पीछेहाट झालेली असताना चंद्राबाबू नायडूंचा तेलगु देसम पक्ष आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तेलगु देसम पक्षाचे १६ खासदार निवडून आले आहेत. आघाडीत तिसऱ्या क्रमांकावर नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं १२ खासदारांसह आपलं महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्यामुळे आता मंत्रीपदांच्या वाटपात इतर मित्रपक्षांना भाजपा किती आणि कोणती खाती देणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
नितीश कुमार ‘या’ तीन मंत्रालयांची मागणी करणार!
नितीश कुमार यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी व एनडीएला पूर्ण समर्थन असल्याचं स्पष्ट केलं आहे. २०१९च्या निवडणुकीत नितीश कुमार यांचे १६ खासदार निवडून आले होते. त्यावेळी त्यांना केंद्रात फक्त एक मंत्रीपद देण्यात आलं होतं. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. यावेळी नितीश कुमार यांच्या जागा ४ ने घटून १२ वर आल्या आहेत. पण भाजपाला स्वबळावर बहुमत न मिळाल्यामुळे आता नितीश कुमार एकऐवजी तीन मंत्रीपदांसाठी आग्रही असतील, अशी माहिती समोर आली आहे. येत्या ८ किंवा ९ जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
इंडियन एक्स्प्रेसनं पक्षातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, नितीश कुमार रेल्वे, ग्रामविकास आणि जलशक्ती या तीन मंत्रालयांसाठी आग्रही असण्याची शक्यता आहे. जर या तीन मंत्रालयांवर घासाघीस झाली तर वाहतूक आणि कृषी या खात्यांचे पर्याय दिले जातील. “नितीश कुमार यांनी पहिली तीन खाती याआधी एनडीएच्या सरकारमध्ये हाताळली आहेत. बिहारच्या विकासासाठी फायदेशीर ठरतील, अशी खाती आमच्या मंत्र्यांनी सांभाळावीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. बिहारमधील पाण्याचा प्रश्न पाहता जलशक्ती खातं महत्त्वाचं आहे”, असं पक्षातील एका नेत्यानं सांगितल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद केलं आहे.