दिगंबर शिंदे, लोकसत्ता
सांगली : सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान यंत्रावरून काँग्रेसची हात निशाणी गायब होणार असून, या वेळी काँग्रेसचे विशाल पाटील कोणती भूमिका घेतात याकडे सांगलीचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी यांच्या आघाडीमध्ये सांगलीची जागा स्वाभिमानीसाठी सोडण्यात आल्याने सांगलीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता. या वेळी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात ठाकरे गटाला सांगलीची जागा मिळाल्यानंतर काँग्रेस निवडणूक मैदानापासून दूरच राहिली.
हेही वाचा >>> निवडणुकीनंतर शिंदे, पवारांचे पक्ष संपल्यावर भाजपची ढेकर – संजय राऊत
कार्यकर्त्यांना अखेपर्यंत सांगलीत काँग्रेसला संधी मिळेल असे वाटत होते. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करणाऱ्या विशाल पाटील यांना काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला नाही. यामुळे मतदान यंत्रावरील काँग्रेसची निशाणी सलग दुसऱ्या निवडणुकीत गायब झाली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील यांनी अपक्ष उमेदवारीही दाखल केली आहे.
मविआमध्ये आघाडी धर्माचे पालन करण्याचे काँग्रेसने मान्य केले असून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी शिवसेनेचे खा. संजय राउत यांची भेट घेऊन तसे आश्वासनही दिले आहे. मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आमदार सावंत उपस्थित होते. मात्र, काँग्रेसचा एबी फॉर्म मिळणार नाही हे गृहीत धरून विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अपक्ष म्हणून मैदानात राहायचे, की आघाडी धर्म म्हणून माघार घ्यायची याचा निर्णय सोमवापर्यंत पाटील यांना घ्यावा लागणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत २२ एप्रिल रोजी दुपारी तीनपर्यंत असून, त्यानंतरच सांगलीतील लढत कशी होणार हे स्पष्ट होणार आहे.