PM Narendra Modi Oath taking Ceremony on 9 June 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या मदतीने केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करणार आहेत. ‘एनडीए’च्या प्रमुखपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली. या बैठकीमध्ये, केंद्रात सरकार स्थापनेचा दावा तातडीने करण्याची विनंती मोदींना करण्यात आली. ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या नेत्यांनी मोदींना पाठिंब्याचे लेखी पत्रही दिले असून मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शनिवारी ८ जून रोजी होण्याची शक्यता होती. परंतु, आता रविवारी ९ जून रोजी शपथविधी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून नरेंद्र मोदी यांची नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कायम राहण्याचे आवाहन केले आहे.
PM Narendra Modi's swearing-in ceremony may take place on 9th June at 6 pm. It was earlier scheduled for 8th June, official confirmation on the final date is awaited: Sources
— ANI (@ANI) June 6, 2024
(file photo) pic.twitter.com/nSWvxz9Ga4
नरेंद्र मोदी यंदा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या या तारांकित शपथविधी सोहळ्यात अनेक परदेशी नेते विशेष पाहुणे म्हणून येणार आहेत. यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राअध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचा समावेश आहे.
हेही वाचा >> मोदी यांचे जगभरातून अभिनंदन; सलग तिसऱ्या ऐतिहासिक विजयाबद्दल कौतुकाचा वर्षाव
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने लोकसभा निवडणुकीत ५४३ पैकी २९३ जागा जिंकत बहुमताचा आकडा पार केला. तर, इंडिया आघाडीनेही एक्झिट पोलचे अंदाज धुडकावून लावत २३४ जागा जिंकल्या. भाजपाचे सर्वाधिक वर्चस्व असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपाने खराब कामगिरी केली असून इंडिया आघाडीने इथं विजय मिळवला आहे.
जनता दल, तेलुगु देशमकडून ग्वाही
मोदींच्या ७ लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी एनडीएच्या तासभर झालेल्या बैठकीत नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू या दोन्ही प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांनी भाजपला सरकार बनवण्यासाठी पाठिंब्याचे लेखी पत्र दिले. बैठकीमध्ये नितीशकुमार यांनी मोदींना लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्याची सूचना केली. ‘एनडीए’ बरोबर असल्याची ग्वाही नायडू यांनी दिल्लीत येण्यापूर्वी विजयवाडा येथे दिली.
मोदी काळजीवाहू पंतप्रधान
मोदींनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेरची बैठक घेतली. आघाडी सरकारचे नेतृत्व करण्याचा अनुभव असल्याने केंद्रातील सरकार आघाडीचे असले तरी नीट कारभार करता येऊ शकेल, अशी ग्वाही मोदींनी मावळत्या सरकारमधील सहकारी मंत्र्यांना दिल्याचे समजते.