शिंदेंच्या शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांचे वडील गजानन किर्तीकर यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे. असली कोण आणि नकली कोण हे या निवडणुकीत ठरणार आहे असं किर्तीकर यांनी म्हटलं आहे. राहुल शेवाळे हे सक्षम नेते आहेत, त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे ते नक्की निवडून येतील असा विश्वासही किर्तीकर यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले आहेत गजानन किर्तीकर?
“राहुल शेवाळे हे आमचे लोकसभेचे गटनेते आहेत. त्यांना प्रशासनाचा आणि राजकारणाचा चांगला अनुभव आहे. आमच्या शिवसेनेचे जे १३ खासदार आहेत त्यांचं नेतृत्व राहुल शेवाळे करतात. ते तुल्यबळ उमेदवार आहेत. ते जिंकून येतील असं मला वाटतं.”
जनता कुणाबरोबर त्याचा निर्णय होईल
“एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांनी चालवण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदेंनी चाळीस आमदारांना घेऊन उठाव केला. त्यानंतर ही निवडणूक पार पडते आहे. जनता कुणाबरोबर आहे ते आता आपल्याला समजणार आहे. राजकारणात जे निवडणूक लढतात ते सगळेच जिंकण्याचा विश्वास व्यक्त करतात. मात्र राहुल शेवाळे निवडून येतील असा माझा विश्वास आहे.” असं किर्तीकर म्हणाले.
हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून…” रोहित पवारांची खोचक टीका!
असली कोण आणि नकली कोण हे कळेल
“अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे यांच्यात काँटे की टक्कर होईल. शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा महाराष्ट्रात नवा ट्रेंड येत्या निवडणुकीसाठी रुजतो आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार निवडले जातात. पण या निवडणुकीत असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण? तसंच असली राष्ट्रवादी कोण आणि नकली कोण याचा निर्णय जनता घेणार आहे.”
अमोल किर्तीकरच्या विरोधात लढणार नाही
गजानन किर्तीकर पुढे म्हणाले की मी शिवसेनेत आहे आणि अमोल उबाठामध्ये आहे. त्याला तिकिट देण्यात आलं आहे. त्यामुळे मी त्याच्या विरोधात निवडणूक लढणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे १३ खासदार आहेत त्यांच्यापैकी मी एक आहे. वयाने ज्येष्ठ म्हणून राहुल शेवाळेंना आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. उत्तर पश्चिममध्ये उद्धव ठाकरेंनी अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली आहे. मी तिथला विद्यमान खासदार आहे. मी मुलाच्या विरोधात लढणार नाही. समाजात चुकीचा संदेश त्यामुळे जाईल. मला माझी प्रतिमा डागाळून घ्यायची नाही. त्यामुळे मी एकनाथ शिंदेंना तशी कल्पना दिली आहे. असंही किर्तीकर म्हणाले.