Omar Abdullah on Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. आम आदमी पक्ष चौथ्यांदा सत्ता स्थापन करणार असे त्यांचे नेते सांगत होते. मात्र मतमोजणीमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली. भाजपा स्पष्ट बहुमत प्राप्त करेल, असे चित्र दिसत आहे. निवडणुकीआधी इंडिया आघाडीत असलेले दोन प्रमुख पक्ष ‘आप’ आणि काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. तर इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला.
लोकसभेत एकत्र निवडणूक लढविणारे ‘आप’ आणि काँग्रेस विधानसभा निवडणुकीत मात्र एकमेकांचे वाभाडे काढताना दिसले. यावरून आता जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर खोचक पोस्ट केली आहे.
भाजपा आघाडीवर गेल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर एक मिम शेअर केले आहे. महाभारतातील एका साधूचा व्हिडीओ शेअर केला आहे. “जी भर के लडो, समाप्त करतो एक दुसरे को”, असा संवाद मिममधील साधू बोलताना दिसत आहेत. तर ओमर अब्दुल्ला यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘और लडो आपस मै’. या कॅप्शनवरून ओमर अब्दुल्ला यांनी आप आणि काँग्रेस यांच्या संघर्षाबद्दल भाष्य केले.
Aur lado aapas mein!!! https://t.co/f3wbM1DYxk pic.twitter.com/8Yu9WK4k0c
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 8, 2025
दिल्ली विधानसभा निवडणूक ही अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. दिल्लीची सत्ता आपने गमावल्यास त्यांना मोठा धक्का बसू शकतो. तर काँग्रेससाठीही ही मोठी नामुष्की असेल. गेल्या काही वर्षांत हरियाणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाने गेल्या २७ वर्षांत दिल्लीत विजय मिळवलेला नाही. उत्तर भारतातील फक्त दिल्ली हेच राज्य असे आहे, जिथे २०१४ नंतर भाजपाला यश मिळालेले नाही.
इंडिया आघाडीचे नेतृत्व कोण करणार, यावरून लोकसभा निवडणुकीपूर्वी रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले. तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वपदासाठी अनेकदा आव्हान दिले आहे. तसेच इंडिया आघाडीतील इतर काही पक्षांनीही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर सकारात्मकता दर्शविली आहे. अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांनीही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिलेला आहे. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला.