J&K Results: “भाजपाने काही जुगाड…”, जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेबाबत ओमर अब्दुल्लांचं मोठं विधान!

Jammu and Kashmir Assembly Election Result 2024: जम्मू-काश्मिरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष आणि बडगावचे उमेदवार ओमर अब्दुल्ला यांनी निकालाच्या आधी मोठे विधान केले आहे.

Omar Abdullah concedes defeat
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Photo – PTI)

Jammu and Kashmir Result 2024: जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल एक दशकानंतर विधानसभा निवडणूक झाली. आज ९० जागांसाठी निकाल जाहीर होत आहे. अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सकाळी एएनाय वृत्तसंस्थेशी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी भाजपावरही टीका केली.

ओमर अब्दुल्ला म्हणाले, “आम्ही विजयी होऊ अशी खात्री वाटते. जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी जे ठरवले आहे, ते दुपारपर्यंत कळेलच. पण निकालात पारदर्शकता असायला हवी. जमुरीयतमध्ये जे काही होईल, ते पारदर्शक पद्धतीने व्हायला हवे. जनतेचा कौल स्वीकारला गेला पाहीजे. जर लोकांचा कौल भाजपाच्या विरोधात असेल तर त्यांनी जुगाड वैगरे केला नाही पाहीजे. राजभवनने कोणताही हस्तक्षेप न करता लोकांचा कौल स्वीकारावा.”

हे वाचा >> Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : जनतेचा कौल कोणाला? इंडियाची ४८, तर भाजपाची २६ जागांवर आघाडी

अनेक एग्झिट पोल्सनी जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन राज्यपातळीवरील पक्ष काय निर्णय घेतात, हे अधिक महत्त्वाचे असणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सनचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हटले की, भारतीय जनता पक्षाला जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीशी आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत.

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स अशी आघाडी होऊ शकते, असे संकेत फारूख अब्दुल्ला यांनी दिले.

काँग्रेसला विजयाचा विश्वास

राजौरी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार इफ्तिकार अहमद माध्यमांशी बोलताना म्हणाले की, लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्साहात राज्यातील जनता सहभागी झाली होती. मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केलं. आम्हाला विश्वास आहे की जनतेने आमच्याच पारड्यात मते टाकली असतील. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी दावा केला आहे की त्यांचा पक्ष राज्यात ३५ हून अधिक जागा जिंकेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Omar abdullah on jammu and kashmir assembly election results 2024 says bjp not to do any trick kvg

First published on: 08-10-2024 at 09:20 IST
Show comments