Omar Abdullah on Article 370: जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकतीच विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. तीन टप्प्यात राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांची घोषणा होताच नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी कलम ३७० वर मोठं विधान केलं आहे. जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुका होताच विधानसभेत केंद्र सरकारच्या विरोधात ठराव मंजूर केला जाईल, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करून राज्याचा विशेष दर्जा काढून घेतला, त्याविरोधात विधानसभेत ठराव करू, असे अब्दुल्ला शनिवारी म्हणाले.
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा आणि राज्यसभेत याबाबतचे विधेयक मांडून कलम ३७० रद्द केले होते. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, राज्याचा विशेष दर्जा काढून घेणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करणे हे विधानसभेतील पहिले काम असेल. विधानसभा गठीत झाल्यानंतर आमच्यासमोरचा हा पहिला कार्यक्रम असेल.
हे वाचा >> बदलत्या वातावरणात काश्मिरींचा कौल कुणाला?
विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करताच दुसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हे विधान केलं आहे. निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानुसार १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत जम्मू आणि काश्मीरच्या ९० जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.
जम्मू आणि काश्मीरमधील विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अबाधित राखल्यानंतर महिन्याभरात केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात येत आहेत. २०१४ साली नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. त्यानंतर १९ डिसेंबर २०१८ पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
ओमर अब्दुल्ला निवडणुकीपासून दूर राहणार
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळत नाही, तोपर्यंत विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचीही घोषणा ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. त्यांचे वडील आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला हे आगामी निवडणुकीत पक्षाचा कारभार पाहणार आहेत. “मी देवाचे आभार मानतो की, अखेर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. तारखांबाबत जरा गोंधळ होता, पण अखेर आता निवडणुका होत आहेत”, अशी प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी दिली.
© IE Online Media Services (P) Ltd