जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ लागला आहे. नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांच्या आघाडीनं बहुमताचा आकडा पार केला असून ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होतील, हे आता स्पष्ट झालं आहे. ओमर अब्दुल्ला यांचे वडील व जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीच ही माहिती दिली आहे. असं करताना त्यांनी हरियाणातील काँग्रेसच्या पराभवावरही भाष्य केलं आहे. त्यांच्या अंतर्गत वादांमुळे त्यांचा पराभव झाला असेल, असं भाष्य फारुख अब्दुल्ला यांनी केलं आहे.
काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?
फारुख अब्दुल्ला यांनी माध्यमांशी बोलताना आगामी सरकार स्थापनेबाबत भूमिका स्पष्ट केली. “दहा वर्षांनंतर लोकांनी आम्हाला बहुमताचा कौल दिला आहे. आमची अल्लाहकडे प्रार्थना आहे की आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकू. जम्मू-काश्मीरमध्ये आमचं सरकार म्हणजे पोलीस राज नसून लोकांचं राज्य असेल. आम्ही तुरुंगात असणाऱ्या निर्दोष लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. माध्यामांना स्वातंत्र्य असेल. हिंदू व मुस्लिमांमध्ये आपल्याला विश्वास निर्माण करावा लागेल. मला आशा आहे की जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पु्न्हा मिळवून देण्यासाठी इंडिया आघाडीतील मित्रपक्ष आमच्यासोबत उभे राहतील. मला असं समजलंय की ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होतील”, असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.
हरियाणात काँग्रेसचा पराभव का झाला?
दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी हरियाणात काँग्रेसच्या पराभवाबाबत भाष्य केलं आहे. “हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याचं मला वाईट वाटतंय. मला वाटतं की त्यांच्या अंतर्गत वादामुळे हे सघळं घडलं”, असंही फारुख अब्दुल्ला म्हणाले.
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : इंडिया आघाडी बहुमताच्या जवळ
अनुच्छेद ३७० निष्प्रभ?
जम्मू-काश्मीरमध्ये यंदाच्या निवडणुकीत अनुच्छेद ३७० आणि त्यानंतर राज्याचा दर्जा मिळवण्यातील राजकीय वाद या बाबी विशेष चर्चेत राहिल्या. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून यासंदर्भात मुद्दे मांडले जात होते. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेपर्यंत भारतीय जनता पक्षाला पोहोचण्यात अपयश आलं. असं असलं, तरी २०१४ पेक्षा यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढल्या असून हा पक्षाचा नैतिक विजयच मानला जात आहे.