Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज (दि.८ मे) सायंकाळी थंडावणार आहेत. १० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर गेले काही आठवडे कर्नाटकमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठलेली दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबंध कर्नाटक राज्य पिंजून काढले. अनेक मतदारसंघांत रोड शो आणि जाहीर सभांच्या माध्यमातून मोदी यांनी भाजपाचा प्रचार केला. या वेळी मोदी आणि भाजपाकडून गांधी परिवाराला लक्ष्य करण्यात आले. गांधी परिवाराला देश तोडायचा आहे. त्यासाठी काँग्रेस पुढाकार घेत असून देशाच्या हिताविरोधातले वर्तन त्यांच्याकडून होताना दिसत आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुड येथे प्रचारफेरीच्या माध्यमातून कर्नाटकमधील प्रचाराचा शेवट करत असताना मोदी यांनी रविवारी हा आरोप केला. ते म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या शाही परिवाराचा देशातील राजकारणावर प्रभाव आहे. त्यांनी छुप्या पद्धतीने परकीय शक्तींशी हातमिळवणी केली असून ज्यांना भारत आवडत नाही, अशा परकीय नेत्यांसोबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत.” ते पुढे म्हणाले की, तुकडे तुकडे गँगचा विचार काँग्रेसमध्ये इतक्या वरच्या पातळीवर पोहोचेल, असा विचार मी कधी केला नव्हता.
“काँग्रेसच्या शाही परिवाराने कर्नाटकच्या निवडणुकीत आपली मर्यादा ओलांडली आहे. देशाच्या भावना आणि परंपरांना त्यांनी नख लावले आहे. मी दुःख व्यक्त करत सबंध हिंदुस्तानवासीयांना सांगू इच्छितो की, काल शाही परिवाराने कर्नाटकच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची भाषा वापरली. याचा अर्थ तुम्हाला कळला का? जेव्हा एखाद्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होते, तेव्हा तो देश सार्वभौम देश असल्याचे मानले जाते. काँग्रेस कर्नाटकाला जेव्हा सार्वभौम म्हणते, याचा अर्थ कर्नाटक भारतापेक्षा वेगळा आहे, असे काँग्रेसला सुचवायचे आहे का?” असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी सभेत उपस्थित केला.
हे वाचा >> Karnataka : सोनिया गांधी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
तुम्हाला हे मान्य आहे का? असे विधान केल्याबद्दल काँग्रेसला शिक्षा द्यायला हवी की नको? याचा अर्थ कर्नाटकाला भारतापासून वेगळे करण्याची भाषा काँग्रेसकडून केली जात आहे. मला कधी वाटले नव्हते की, तुकडे तुकडे गँगचा परिणाम काँग्रेसमध्ये एवढ्या वरच्या पातळीपर्यंत जाईल, असेही ते म्हणाले.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी बंगळुरू येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या या आरोपाला प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान विकास आणि महागाईचे मुद्दे विसरले आहेत आणि मला ते सांगत असलेले आंतरराष्ट्रीय षडयंत्र समजू शकलेले नाही. पंतप्रधानांना अजूनही समजलेले दिसत नाही की, लोकांना त्यांचे दैनंदिन प्रश्न आणि अडचणींवर चर्चा हवी आहे.”
हे ही वाचा >> “मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, राहुल गांधींचा हल्लाबोल
मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते, काँग्रेसने स्वातंत्र्यसैनिकांचा आणि देशभक्त असलेल्या कन्नडिगांचा अवमान केला आहे. राज्या-राज्यांना विभागून दोन भावांमध्ये भांडणे लावणे, हा काँग्रेसचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसने विभाजन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा देशवासीयांनी एकत्र येत काँग्रेसचा पराभव केला. राजकीय प्राणवायू मिळावा यासाठी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकची सत्ता हवी आहे. पण आमचा पक्ष त्यांना १० मे रोजी प्रत्युत्तर देईल, असेही ते म्हणाले.
काँग्रेस जेव्हा सत्तेत येते, तेव्हा दहशतवादी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढतात. हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक आहे. काँग्रेसने दहशतवाद्यांचे तुष्टीकरण केलेले आपण याआधी केरळ आणि कर्नाटकात पाहिले आहे. १० मे रोजी, जेव्हा तुम्ही मतदान कराल, तेव्हा ही बाब ध्यानात ठेवा, असे आवाहन मोदी यांनी केले. जिथे कायदा आणि सुव्यवस्था चोख असते, तिथेच गुंतवणूक येते. फक्त भाजपा असा पक्ष आहे, जो कायदा व सुव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.