उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अर्चना पाटील यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. अर्चना पाटील यांचे पती आणि तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करून भाजपात प्रवेश केला होता. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात उस्मानाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली आहे. अजित पवार गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याने त्यांनी भाजपाच्या अर्चना पाटील यांना त्यांच्या पक्षात घेत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. राणा जगजीतसिंह पाटील भाजपात आहेत तर पत्नी अर्चना पाटील राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे विरोधक पाटील दाम्पत्यावर टीका करू लागले आहेत.
राणा पाटील कुटुंबाचे विरोधक आणि उस्मानाबादचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, राणाजगजीतसिंह पाटील यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा त्यांनी अजित पवारांवरच खापर फोडलं होतं. आता सत्तेसाठी त्यांच्या पत्नी अर्चना पाटील परत राष्ट्रवादीत गेल्या आहेत. म्हणजे आता तेच अजित पवार यांना चालतात का? लोकांना गृहित धरून राजकारण केलं जात आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्याच घरात, कुटुंबात पद राहिलं पाहिजे असा त्यांचा अट्टाहास आहे. त्यामुळे अर्चना पाटलांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देणं म्हणजे सत्तेच्या लालसेपोटी केलेली ही खेळी आहे.
दरम्यान, ओमराजेंच्या या टीकेला अर्चना पाटील यांचे पूत्र मल्हार पाटील यांनी उत्तर दिलं आहे. हे उत्तर देताना त्यांनी अजित पवारांचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मल्हार पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून अजित पवारांच्या सहमतीने २०१९ मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून भाजपात प्रवेश केला. मी हे अतिशय जबाबदारीने सांगतोय की, अजित पवारांनीच आम्हाला आधी पाठवलं आणि मग ते स्वतःदेखील भाजपाबरोबर आले. तुम्ही (ओमराजे निंबाळकर) आमची चिंता करू नका. आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजपा आणि हातात धनुष्यबाण आहे. आम्ही पूर्ण ताकदीने महायुतीचं काम करू.
हे ही वाचा >> सुनेत्रा पवारांसाठी प्रचारसभा घेणार का? राज ठाकरेंचं उत्तर, म्हणाले, “मैदानं..”
मल्हार पाटलांच्या या गौप्यस्फोटावर ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मल्हार पाटलांच्या गौप्यस्फोटावर तुम्ही (प्रसारमाध्यमं) अजित पवार यांच्याकडून स्पष्टीकरण घेणं अपेक्षित आहे. त्यांचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचं षडयंत्र २०१९ पासून चालू होतं का? कारण मल्हार पाटील यांच्या वक्तव्यातून ही बाब समोर आली आहे की, अजित पवारांनीच त्यांना भाजपात पाठवलं होतं. अजित पवारांनी २०१९ पासूनच हे षडयंत्र सुरू केलं होतं का असा प्रश्न पडला आहे. त्यावरअजित पवारांनी स्पष्टीकरण द्यावं.