नाशिकसह, मुंबई आणि इतर भागांमध्ये लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पुढच्या सोमवारी म्हणजेच २० मे रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रचारसभा सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वीच नाशिकजवळच्या दिंडोरीमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. मोदींच्या भाषणाआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण झालं. आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“गोदावरीच्या किनाऱ्यावर आज आपल्याला भेटण्यासाठी मोदी आले आहेत. गंगापुत्र मोदींना मी इतकीच विनंती करणार आहे की नाशिक, नगर आणि मराठवाड्यात पश्चिमी वाहिन्यांचं पाणी आणायचं आहे त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. आपल्याला माहीत आहेच की मोदी है तो मुमकीन है. आपलं सरकार तुम्हाला ते पाणी देणारच. ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे पण वाचा- मराठी माणूस मुंबईबाहेर का गेला, याचे उद्धव यांनी उत्तर द्यावे; वरळीतील सभेत देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान
उद्धव ठाकरेंवर टीका
“तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो आहे, की निवडणूक तुम्ही पाहात आहातच. तुम्ही हेदेखील पाहात आहात मोदींच्या विकासासमोर कुणालाही मतं मागता येत नाहीयेत. भारतातली मतं संपली आहेत पाकिस्तानातून मतं मागण्याचं काम विरोधक करत आहेत. राहुल गांधींसाठी पाकिस्तानाचे मंत्री पोस्ट करत आहेत. आम्हाला वाटलं की उद्धव ठाकरे वेगळे असतील. पण मला आश्चर्य वाटतं की परवा उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता. काय दुर्दैव आहे बघा, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांसाठी जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी देशभक्त मोदींच्या पाठीशी उभे राहतील. २० तारखेला भारतीताईंना निवडून द्या तसंच हेमंत गोडसेंना निवडून द्या. मोठ्या प्रमाणावर मतदान करावं ही विनंती करतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर नरेंद्र मोदींचं भाषण झालं. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसला विरोधी पक्षात बसता येईल अशाही जागा मिळणार नाहीत असं म्हटलं आहे.
हे पण वाचा- केतन तिरोडकर यांना अटक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“काँग्रेसची अवस्था अशी आहे की त्यांना विरोधी पक्षातही बसता येणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातले एक नेते आहेत, त्यांनी असा दावा केला आहे की निवडणूक संपल्यावर काँग्रेस पक्षात लहान पक्ष विलीन होतील. तसा सल्लाच या बड्या नेत्याने दिला आहे. कारण त्यांना वाटतं की सगळी दुकानं सुरु आहेत ती एकत्र आली तर काँग्रेस विरोधी पक्षात बसू शकतो. ही यांची अवस्था आहे.” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.