बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर खूप सतर्क असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ते आणि त्यांचे कार्यकर्ते स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, बजरंग सोनवणे बीडचे निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांच्यावर संतापल्याचं चित्र काल (रविवार, २ जून) पाहायला मिळालं. त्यावेळी सोनवणे यांनी कांबळे यांना स्वत:ला संपवून घेण्याची धमकी दिल्याचंही पाहायला मिळालं. सोनवणे म्हणाले, “कांबळे साहेब हात आखडू नका, अन्यथा मी स्वत:ला संपवून घेईन”. सोनवणे यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली. या सर्व प्रकारावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. सोनवणे यांच्या प्रतिस्पर्धी आणि बीड लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझाही पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, मी तो पराभव हसतमुखाने स्वीकारला”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, निवडणुकीच्या निकालाबाबत प्रसारमाध्यमं प्रश्न विचारू लागली आहेत, त्यामुळे आता थोडी धाकधुक वाटायला हवी. गेले काही दिवस मी खूप व्यस्त होते. त्यामुळे निकालाबाबत विचार करण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. मुळातच आपल्या संस्कृतीत सांगितलंय की ‘कर्म करा, फळाची चिंता करू नका’. केवळ योग्य पद्धतीने तुमचं कर्म करा. कर्म करताना कुठल्याही अभद्र पद्धतीने वागू नका. मी या गोष्टीची नेहमीच काळजी घेत आले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी कर्म करताना ज्या विचारांशी बांधले आहे, ज्यासाठी मी राजकारणात आले आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून काम करत आलेय. २२ वर्षांच्या राजकीय जीवनात कोणत्याही व्यक्तीबाबत, वर्गाबाबत किंवा कोणत्याही विचारसरणीविषयी एवढ्या संकटातही माझ्या तोंडून एकही अपमानजनक वक्तव्य गेलेलं नाही. याचा मला अभिमान आहे. या निवडणुकीत मला विजय मिळेल याचा मला विश्वास आहे.

हे ही वाचा >> मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं, मंत्रालयासमोरची घटना

दरम्यान, बजरंग सोनवणे यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांशी झालेल्या वादावरही पंकजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, देशात सर्वत्र जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्याकडे लोकसभेच्या निवडणुकीचं काम सोपवण्यात आलं आहे. आत्ता केवळ बीडमध्येच निवडणूक झालेली नाही. मी स्वतः या जिल्ह्याची पालकमंत्री होते, सत्तेत होते तेव्हादेखील मी सत्तेचा गैरवापर केला नाही. आता तर मी सत्तेतही नाही. ते जे काही आरोप करतायत ते सगळं चुकीच्या पद्धतीने चाललंय. मागील निवडणुकीतही आमच्याविरोधात तेच होते, तेव्हादेखील आमच्याकडून सत्तेचा गैरवापर झाला नाही. यावेळच्या निवडणुकीत थोडं वेगळं चित्र होतं. ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने झाली आहे. त्यामुळे उद्या काहीही होऊ शकतं. मात्र मला वाटतं की, त्यांनी (बजरंग सोनवणे) आदळआपट करण्यापेक्षा ते स्वीकारलं पाहिजे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला होता, तो मी स्वीकारला. यावेळी मात्र माझा विजय होईल आणि तो देखील मी आनंदाने स्वीकारेन.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde slams bajrang sonawane over arguing with election officials beed lok sabha election 2024 asc
Show comments