बीडमधील भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांच्याजागी लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे पंकजा मुंडेंचं पुनर्वसन झाल्याची भावना व्यक्त होत असताना दुसरीकडे प्रीतम मुंडेंचं तिकीट कापल्यामुळे त्याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या सर्व मुद्द्यांवर भाष्य करताना खुद्द पंकजा मुंडेंनी त्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक नव्हत्या, असं म्हटलं आहे. आपल्याला राज्यातच राहायचं होतं, असंही त्यांनी शुक्रवारी बीडमध्ये केलेल्या भाषणात म्हटलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या पंकजा मुंडे बीडमध्ये?

पंकजा मुंडेंनी बीडमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या एका सभेमध्ये पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रानं उमेदवारी दिली नसून मोदांनी दिली आहे, असं विधान केल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. “मला उमेदवारी मोदींनी दिली, माझं तिकीट राज्यानं ठरवलेलं नाही. देशानं ठरवलेलं आहे. देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवलेलं आहे. मला लोकसभा लढवायची नव्हती. कारण मला राज्यात काम करायची इच्छा होती. पण माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी बुद्धीनं निर्णय घेतला”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

“दिल्लीचे लोक सहा महिन्यांपासून मागे लागले होते”

दुपारी सभेमध्ये केलेल्या या विधानानंतर संध्याकाळी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सभेत बोलताना पंकजा मुंडेंनी आपल्या निर्णयावर सविस्तर भाष्य केलं. “मला माझ्या बहिणीला विस्थापित करायचं नाही. पण या युतीमुळेच परळी मतदारसंघाचा प्रश्न उभा राहिला. दिल्लीच्या लोकांनी गेल्या सहा महिन्यांपासून ससेमिरा लावला होता की आम्हाला तुम्ही दिल्लीत हव्या आहात. पण मी कोणत्याही परिस्थितीत नाहीच म्हणायचे. पण आता कोणत्याही चर्चेशिवाय थेट नावच जाहीर झालं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पक्षाने सांगितले तर जानकर यांच्यासमवेत चर्चा करण्यास तयार – पंकजा मुंडे यांची माहिती

“…तर मी २०१४लाच दिल्लीत गेले असते”

दरम्यान, २०१४मध्येच दिल्लीला जायची संधी होती, अशा आशयाचं विधान पंकजा मुंडेंनी केलं आहे. “गोपीनाथ मुंडे जिवंत असते तर मी २०१४लाच दिल्लीत गेले असते. कारण ते मुख्यमंत्री होण्यासाठी राज्यात आले असते आणि मला त्यांनी दिल्लीला पाठवलं असतं. मी काही उमेदवारीसाठी बायोडेटा घेऊन फिरले नाही. पण मला ही उमेदवारी आली आहे”, असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.

“हा कडू घोट मला प्यावा लागला. समुद्रमंथनातून निघालेलं विष महादेवालाच पचवावं लागलं. कधीकधी राजकारणात एखाद्या माणसाला ती भूमिका घ्यावी लागते. मी मोठी आहे, मला ती भूमिका घ्यावी लागली. देणं हा माझा स्वभाव आहे, घेणं नाही. मला ते वाईट वाटतं. पण कदाचित आत्ताच्या राजकीय परिस्थितीत हेच योग्य आहे. प्रीतम मुंडे उभ्या असत्या तरी मी हेच केलं असतं”, असंही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde speech in beed rally speaks on devendra fadnavis bjp pmw