राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. रविवारी भाजपाने ९९ जागांसाठी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर आज किंवा उद्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी आज परिवर्तन महाशक्ती आघाडीने १० जागांसाठी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी यासंदर्भात माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिवर्तन महाशक्ती आघाडीकडून १० उमेदवारांची नावे जाहीर

राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवर्तन महाशक्ती आघाडीने आज १० उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यापैकी चार जागा प्रहार जनशक्ती पक्षाला, तर दोन जागा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला, एक जागा महाराष्ट्र राज्य समिती, तर एक जागा स्वतंत्र भारत पक्षाला देण्यात आली आहे. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही दोन जागा देण्यात आल्या आहेत. मात्र, या जागांसाठी अद्याप नावांची घोषणा झालेली नाही.

हेही वाचा – भाजपाच्या उमेदवार यादीवरून बच्चू कडूंचं टीकास्र; म्हणाले, “केंद्रात सत्ता असतानाही माझ्याविरोधात…”

बच्चू कडूंना अचलपूरमधून उमेदवारी

परिवर्तन महाशक्ती आघाडीने अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी दिली आहे. तर रावेरमधून अनिल चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच चांदवड विधानसभा मतदारसंघातून गणेश निंबाळकर, देगलूर बिलोलीमधून सुभाष सामने, ऐरोलीमधून अंकुश कदम, हदगाव हिमायतनगरमधून माधव देवसरकर, हिंगोलीमधून गोविंदराव भवर, राजुरामधून वामनराव चटप यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय शिरोळ आणि मिरज या दोन जागां स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. पण उदेवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही.

“भविष्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता”

दरम्यान, या पत्रकार परिषदेला संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडूदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “परिवर्तन महाशक्ती आघाडी विधानसभा निवडणूक लढवणार ही नाही, असे अनेकांना वाटत होते. पण आता आम्ही नावे जाहीर करत आहोत. आम्ही इतर पक्षांसारखे वेगवेगळे नावे जाहीर न करता एकत्र केली आहे. भविष्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. त्यातील एक पक्ष फुटून बाहेर निघणार आहे. तर महायुतीतील एक मित्र बाहेर जाणार असल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे.”

हेही वाचा – भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

“लवकरच आणखी काही उमेदवारांची नाव जाहीर करू”

“आजपर्यंत राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांनीही सत्ता भोगली आहे. मात्र आजही आपण केवळ मूलभूत प्रश्नांवरच चर्चा करत आहोत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे विकासाची दूरदृष्टी बघायला मिळत नाही. त्यामुळेच आम्ही परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. आमच्या या आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज आम्ही १० जांगासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, लवकरच आम्ही आणखी काही उमेदवारांची नाव जाहीर करू”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parivartan mahashakti alliance announced list of ten candidate for maharashtra assembly election