पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. परळी या ठिकाणी त्यांची प्रचारसभा पार पडली. ११ मे रोजी जी सभा पार पडली त्या सभेत उपस्थितांना पंकजा मुंडेंनी काही प्रश्न विचारले आहेत. माझ्या सभेमुळे जर इतर ठिकाणचे खासदार निवडून येणार असतील तर तुम्ही मला मतदान करणार नाही का? मी विकास केला की नाही? विकास करताना मी जातीयवाद केला नाही. कधीही जात-पात पाहिली नाही. माझ्यासमोर येणाऱ्या व्यक्तीला कधी जात विचारते का? असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
काही शक्ती जाती-पातीचं विष पेरत आहेत
“जाती-पातीचं विष पेरण्याचं काम काही शक्ती करत आहेत. मात्र त्यांना बळी पडू नका. या भागाच्या विकासासाठी मी निवडणूक लढवते आहे. प्रभू वैद्यनाथाची ही सावली दूर करु नका. प्रत्येक बूथ मजबूत करा. मी मजबूतपणे विकास करत राहणार असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं आहे.
हे पण वाचा- पंकजा मुंडे यांना ‘माधव’चे बळ
मुस्लिम बांधवांना भीती दाखवली जाते आहे
लोकांना सध्या भूलथापा मारल्या जात आहेत, मुस्लिम बांधवांना भीती दाखवणं सुरु आहे. मात्र एकाही मुस्लिम बांधवाने घाबरण्याची आवश्यकता नाही. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आम्ही बहीण-भाऊ मिळून सगळ्या जाती-धर्मांना आणि समाजातल्या सगळ्या बांधवांना बरोबर घेऊन वाटचाल करणार आहोत. आपल्या भागाचा विकास करु असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचेही आभार मी मानते. १३ तारखेला मतदान करुन मला निवडून द्या असं आवाहनही पंकजा मुंडेंनी भाषणात केलं.
४ जूनबाबत भावनिक आवाहन
४ जून या दिवशी आपला निकाल आहे. ४ जून २०१४ या दिवशी याच हातांनी मी मुंडेसाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यावेळी मी त्यांचा सत्कार करणार होते. अख्खी परळी त्यासाठी सजली होती. पण त्या सोहळ्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. ४ जून ही तारीख काळाने पुन्हा आपल्यासमोर आणली आहे. ते अधुरं स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यासमोर आहे असं भावनिक आवाहन पंकजा मुंडेंनी उपस्थितांना केलं.
आणखी काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
“२०१४ मध्ये मला गोपीनाथ मुंडेंनी फक्त पाच वर्षे मागितली होती पण ती बघण्याआधीच ते गेले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका घेतली होती की गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबातला उमेदवार असेल तर आम्ही उमेदवार देणार नाही. गोपीनाथ मुंडेंना तेव्हा १७ दिवस झाले होते आणि केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन सहा दिवसच झाले होते पण त्यांचं सातव्या दिवशी निधन झालं. त्यानंतर कुटुंबासाठीची भावना तीव्र होती की आम्ही मुंडेंना मतदान करणार. हे मी सगळं मी जे परिवारवाद म्हणतात त्यांना सांगते आहे. लोकभावना खूप महत्त्वाची होती म्हणून मी राजकारणात आले. माझ्या आईला विचारलं होतं की तुम्ही निवडणुकीला उभ्या राहा. पण माझी आई तेव्हा दुःखात होती. त्यामुळे तिने नकार दिला. मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझा मुलगा पाच वर्षांचा होता. पण जबाबदाऱ्यांमुळे हे निर्णय घ्यावे लागतात.” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.