“मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यात फरक आहे”, असं विधान करून शरद पवारांनी चर्चेला तोंड फोडलं होतं. सून सुनेत्रा पवारांबाबत त्यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातून बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. लेकीच्या प्रेमापोटी सुना बाहेरच्या वाटतात का असा सवालही त्यांना विचारण्यात आला होता. आता, त्यांच्याच कुटुंबातील दुसरी सून आणि सुनेत्रा पवारांच्या सख्ख्या जाऊबाई शर्मिला पवार यांनी शरद पवारांच्या या वक्तव्याला समर्थन केलं आहे. त्या सुप्रिया सुळेंच्या महिला मेळाव्यानिमित्त बोलत होत्या.
“मूळ पवार कोण? या साहेबांच्या वक्तव्यावर बोळण्याइतपत मी मोठी नाही. पण पवारांची सून म्हणून मी नक्कीच बोलेन की मी किंवा आम्ही सर्व सुना आम्ही पवारांच्या घरात त्यांच्या लोकाशी लग्न करून आलेलो आहोत. लग्न करून या नात्याने आम्ही पवार आहोत. पण सुप्रिया ताई या जन्माने पवार आहेत. त्यांच्या रक्ताने त्या या नात्यात आहेत”, असं शर्मिला पवार म्हणाल्या.
हेही वाचा >> अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत, “पारावरचे लोक म्हणतात दादांनी या वयात साहेबांना सोडायला नको होतं, मी त्यांना कधीही..”
“माझं वैयक्तिक मत आहे की पवारांचा ओरिजिनल डीएनए हा सुप्रियाताईंमध्येच आहे. त्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही. मी पवारांची सून आहे, याचा मला अभिमान आहे. परंतु माझ्या नणंदेची जागा मी नाही घेणार”, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना नोटीस
दरम्यान, बारामती मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीत उमेदवाराने दाखविलेला आणि प्रशासनाकडील खर्चात तफावत आढळल्याने महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. याबाबत दोन दिवसांत खुलासा न दिल्यास ही तफावत मान्य असल्याचे ग्राह्य धरून हा खर्च त्यांच्या खात्यात दाखविला जाणार आहे.
बारामती मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचार खर्चाची दुसरी तपासणी करण्यात आली. त्यानुसार सुळे आणि पवार यांनी दाखविलेल्या खर्चात अनुक्रमे १.३ लाख आणि ९.१० लाख रुपये खर्चाची तफावत आढळली. ही तफावत उमेदवारांच्या प्रतिनिधीने अमान्य केली. याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याबाबत जिल्हा खर्च निरीक्षण समितीकडे दाद मागता येणार आहे.