लोकसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. अनेक जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. पारंपरिक मतदारसंघ नवख्या उमेदवाराच्या हाती गेल्या आहेत, तर काही ठिकाणी अत्यंत मोठ्या फरकाने लाजिरवाणा पराभव झाला आहे. राज्यात दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ही जागाही त्यातीलच एक होती. या मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे पाटील या मतदारसंघातून उभे होते, तर शरद पवार गटाने निलेश लंके यांना संधी दिली होती. निलेश लंके यांनी या संधीचं सोनं केलं आहे. परंतु, त्यांच्या अपघताचे कट रचले जात होते, असा मोठा खुलासा निलेश लंके यांच्या आईने केला आहे. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
“निवडणुका सुरू झाल्यापासून मला टेन्शन वाटत होतं. काहीजण म्हणाले मतदानाच्या दिवशी काहीही होऊ शकतं. समोर एवढा मोठा पैलवान आहे तर निवडणूक जड जाईल. पण शरद पवारांनी खूप साथ दिली. माझा पोरगा शरद पवारांना फार मानतो. त्यामुळे पवारांची त्याला सेवा करायची आहे. कारण, ते सुखात-दुःखात नेहमी असतात”, असंं त्या म्हणाल्या.
हेही वाचा >> नगर : मतांच्या ध्रुवीकरणावर थेट लढतीचा कौल
त्या पुढे म्हणाल्या की, “माझ्या लेकाचा अपघात व्हावा म्हणून काही जणांनी दोन-तीन लाखांच्या पूजाही मांडल्या होत्या. त्यामुळे मी घाबरले होते.परंतु, पूजा मांडून कोणी मरत नाही, असं माझा मुलगा म्हणाला. पण काहीजणांनी माझ्या मुलाचा अपघात व्हावा, तो गाडीखाली यावा म्हणून दोन-तीन लाखांच्या पूजा घातल्या होत्या.”
दरम्यान, निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा २९ हजार ३१७ पराभव केला आहे. निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात अटीतटीची लढत सुरू होती. दोघेही फार कमी फरकाने एकमेकांच्या मागे होते. त्यामुळे अहमदनगरची सत्ता कोणाच्या ताब्यात जाईल हे दुपारपर्यंतही स्पष्ट होत नव्हते. अखेर निलेश लंकेंनी चांगली आघाडी घेतली आणि सुजय विखे यांचा पराभव केला.
प्रचारातही टफ फाईट
धनगर समाजाची मते प्रभावी ठरणारे राज्यात जे मतदारसंघ आहेत, त्यात नगरचा समावेश होतो. हे ओळखूनच दोन्ही बाजूंनी त्यावर भर दिला गेला. हा मोह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही टाळता आला नाही. त्यामुळे विखेंच्या बाजूने अहिल्यानगर नामांतर आणि विरुद्ध बाजूने रखडलेले धनगर समाज आरक्षण यावर प्रचारात भर राहिला. दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा क्षीण झाला होता.