“ब्रज असे ठिकाण आहे, जिथे उत्तर प्रदेशची भेट राजस्थानशी होते आणि मथुरा हे संपूर्ण भारताचे आदरस्थान आहे”, असे विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. २३ नोव्हेंबर) मथुरा येथे मीराबाई जन्मोत्सवात हजेरी लावली. संत मीराबाई यांच्या ५२५ व्या जयंतीचे औचित्य साधत मथुरामध्ये दरवर्षीप्रमाणे ब्रज रज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांच्या उपस्थितीत मीराबाई यांच्या स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे उद्या, दि. २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान होत आहे. त्याच्या दोन दिवस आधी राजस्थानच्या सीमेवर असलेल्या मथुरा जिल्ह्यातील कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांनी हजेरी लावली. तसेच श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात जाऊन दर्शनही घेतले.
राजस्थानमधील भरतपूर आणि ढोलपूर हे दोन जिल्हे उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून आहेत. हे दोन्ही जिल्हे ब्रज प्रांताचा भाग आहेत, ज्याचे केंद्र मथुरा येथे आहे. या प्रांतामध्ये मध्ययुगीन काळातील भक्तीची परंपरा चालत आली आहे. विशेष करून संत मीराबाई यांच्या कवितांना येथील परंपरेत विशेष स्थान आहे.
हे वाचा >> गॅस सिलिंडर, मोफत लॅपटॉप ते वीमा, राजस्थानमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात श्रीकृष्ण यांचा संबंध यूपी-राजस्थान आणि गुजरातशीही असल्याचे सांगितले. “ही जागा साधारण नाही. येथील मातीच्या प्रत्येक कणात भगवान कृष्ण आहेत. मथुरेत येण्यासाठी मी खूपच उत्साहीत होतो, त्याचे आणखी एक कारण म्हणजे मुथरेचे गुजरातशी असलेले नाते. भगवान कृष्ण यांनी गुजरातमध्ये येऊन द्वारका वसविली होती. मीराबाईंनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ द्वारकेतच काढला होता.” यावेळी बोलत असताना पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका जुन्या मागणीचा विचार बोलून दाखविला. ब्रजपासून त्याचे देवत्व हिरावून घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. ज्याप्रमाणे काशीमध्ये विश्वनाथ धाम आहे, उज्जैनमध्ये महाकाल आणि अयोध्येमध्ये आता मंदिर निर्माण होत आहे, त्याप्रमाणे मथुरादेखील मागे राहणार नाही.
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात सात आणि ढोलपूर जिल्ह्यात चार विधानसभेचे मतदारसंघ आहेत. २०१८ च्या निवडणुकीत भाजपाने दोन्ही जिल्ह्यांतील ११ जागांपैकी ढोलपूर जिल्ह्यात केवळ एक जागा मिळवली होती. सात जागा काँग्रेसने, दोन बसपा आणि एक जागा राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) पक्षाने जिंकली होती.
काँग्रेस आणि आरएलडी पक्षाने राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी आघाडी केली आहे. भरतपूरमधील केवळ एक जागा काँग्रेसने आरएलडी पक्षाला देऊ केली आहे. सुभाष गर्ग हे आरएलडीकडून निवडणूक लढत आहेत. राजस्थानमधील भरतपूर आणि यूपीतील मथुरेत जाट समूहाचे प्राबल्य आहे. आरएलडी पक्षाकडे जाट समूहाचा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. यासह राजस्थानच्या काही भागात विशेष करून अलवर आणि हरियाणाच्या सीमेवर यादव समाज वास्तव्यास असून तो कृष्ण भक्त असल्याचे मानले जाते.
आणखी वाचा >> नरेंद्र मोदींची राजस्थानच्या जनतेला भावनिक साद; खुल्या पत्रात काँग्रेसवर टीकेचे आसूड!
मीराबाई यांची जयंती राजस्थानमध्येही मोठ्या आदराने साजरी केली जाते. राजस्थानमधील पाली येथे राठोड या राजपूत घराण्यात त्यांचा जन्म झाल्याचे आणि मेर्ता येथे त्यांचे बालपण गेल्याचे म्हटले जाते. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते नलीन कोहली यांनी म्हटले की, मोदींच्या मथुरा भेटीचा कोणताही राजकीय संबंध नाही. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मथुरा येथील कृष्ण भूमी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मथुरा उत्तर प्रदेशमध्ये येत असून तिथे अद्याप कोणतीही निवडणूक नाही. भगवान कृष्णाच्या भक्त असलेल्या मीराबाई यांची ही ५२५ वी जयंती आहे, त्यामुळे हा कार्यक्रम टाळणे योग्य झाले असते का?”, असा प्रश्न कोहली यांनी उपस्थित केला.