Narendra Modi In Maharashtra : ४ जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असून त्यानंतर या आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी मिळणार नाही, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच काँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले, असेही ते म्हणाले. नगरमधील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
“आज देशात तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपाला समर्थन मिळत आहे. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे ४ जून रोजी इंडिया आघाडीची ‘एक्सपायरी डेट’ निश्चित केली आहे. त्यानंतर इंडिया आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी सापडणार नाही. निवडणुकीपूर्वी जो भानूमतीचा कुणबा जोडला गेला, तो ४ जून नंतर दिसणार नाही”, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
हेही वाचा – प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
“इंडिया आघाडीकडून तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न”
“यंदाची निवडणूक ही संतुष्टीकरण विरुद्ध तुष्टीकरण, अशी आहे. भाजपाकडून देशावासियांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तर इंडिया आघडीच्या नेत्यांकडून तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे”, असेही ते म्हणाले.
“काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लीम लीगप्रमाणे” :
पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केलं. “काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा मुस्लीम लीगप्रमाणे बनवला आहे. एकीकडे एनडीए विकासाच्या गोष्टी करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याच्या परिस्थितीत नाही. काँग्रेसकडे बोलण्यासारखं काहीही नाही. काँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले आहे. त्यांनी देशातील गरिबांचा विश्वासघात केला”, अशी टीका त्यांनी केली.
वडेट्टीवारांच्या विधानावरून काँग्रेसवर टीका
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांच्या विधानावरूनही त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. देशात सध्या काँग्रेसची ‘अ’ टीम पराभवाचा सामना करत आहे. त्यामुळे काँग्रेसची पाकिस्तानातील ‘ब’ टीम सक्रीय झाली आहे. काँग्रेसला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानातून ट्वीट केली जात आहेत. त्याबदल्यात काँग्रेस पाकिस्तानला दहशतवादी हल्लात क्लीन चीट देत आहे. मुंबई हल्ल्याची सत्यता सर्वांना माहिती आहे. तरीही काँग्रेस दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र वाटत आहे. मुंबईतील हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याने जे विधान केलं आहे, ते शहिदांचा अपमान करणारे आहे. काँग्रेसनेचे नेते आता कसाबची बाजू घ्यायला लागले आहेत, असे ते म्हणाले.