PM Modi Praise Mohammad Shami During Election Rally: आज १९ एप्रिलपासून भारतात लोकसभा निवडणूक पर्वाची नांदी झाली आहे. पहिल्या टप्यातील मतदान चालू असताना अनेक बड्या नेत्यांच्या प्रचारसभा सुद्धा जोरदार चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाचे उमेदवार कंवर सिंह तंवर यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने अमरोहा येथे मतदारांशी संवाद साधला. याच सभेत मोदींनी मत मागताना भारतीय खेळाडू मोहम्मद शमीच्या कौतुकाचे पूल सुद्धा बांधले. खरंतर मोहम्मद शमी हा अमरोहाचा रहिवाशी आहे त्यामुळे अमरोहाच्या मतदारांसमोर शमीचा उल्लेख करणं हे मोदींचं मतदारांना जोडून ठेवण्याचं उत्तम तंत्र म्हणता येईल.
प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “देशात अमरोहाचे केवळ ढोलच नव्हे तर डंकाही वाजला आहे. क्रिकेट विश्वचषकात भाई मोहम्मद शमीने जी कमाल केली ती सगळ्या जगाने पाहिली आहे. त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी त्याला यंदाचा अर्जुन पुरस्कार सुद्धा केंद्र सरकारने बहाल केला आहे. योगी सरकार सध्या इथल्या खेळाडूंसाठी आणखी स्टेडियम बांधत आहे. यंदाच्या लोकसभेत ‘अमरोहाची एकच थाप- कमळावर छाप’, ‘अमरोहाचा एकच स्वर, फिर एक बार मोदी सरकार’ याची प्रचिती येईल अशी आशा.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी सुद्धा अनेक प्रसंगी मोहम्मद शमीचे कौतुक केले आहे. जेव्हा भारतीय संघ विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता तेव्हा मोदींनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली होती. मोहम्मद शमीला भेटताच त्यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्याला प्रोत्साहन सुद्धा दिलं होतं हा व्हिडीओ सुद्धा त्यावेळी खूप व्हायरल झाला होता.
हे ही वाचा<< भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येच झाली हाणामारी आणि दोष मात्र.. प्रचारयात्रेचा Video पाहून पडाल बुचकळ्यात, खरं काय?
इंडिया आघाडीची सर्व शक्ती ‘या’च कामात जाते व्यर्थ
दरम्यान, मोदी पुढे म्हणाले की, ” लोकसभा निवडणूक ही देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. आपलं एक एक मत भारताचं भविष्य सुनिश्चित करणार आहे. भाजपा भारतातील गावांच्या, गरिबांच्या प्रगतीचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहे तर इंडिया आघाडीची सर्व शक्ती ही गावांना आणखी मागास करण्यातच केंद्रित आहे. या मानसिकतेचे परिणाम यापूर्वी अमरोहासहित पश्चिम-उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहेत. या भागात अनेक कष्टाळू शेतकरी आहेत, काँग्रेस, सपा, बसपाने या शेतकऱ्यांच्या समस्यां कधी ऐकल्या नाहीत, पाहिल्या नाहीत ना त्यांची काही पर्वा या लोकांना आहे. याउलट भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. माझी सर्व मतदारांना विनंती आहे की संविधानाने तुम्हाला दिलेल्या या अधिकाराचा नक्की उपयोग करा विशेषतः तरुणांना मी आग्रह करेन ही संधी तुमच्या हातून जाऊ देऊ नका. “