देशभर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान चालू आहे. दुसऱ्या बाजूला, ज्या ज्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांमध्ये (पाचवा, सहावा आणि सातवा टप्पा) मतदान होणार आहे तिथे अद्याप प्रचार चालू आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१३ मे) बिहारच्या मुजफ्फरपूर येथे एनडीए उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी अलीकडेच पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही काँग्रेसवर निशाणा साधला. मणिशंकर अय्यर म्हणाले होते की “भारताने पाकिस्तानशी सुसंवाद राखावा आणि आपल्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करू नये, अन्यथा पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रे तैनात करू शकतो.”, यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, हे काँग्रेसवाले पाकिस्तानला घाबरून राहतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सध्या देशभर भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं वादळ घोंगावतंय. बिहारमध्येही तीच परिस्थिती मला पाहायला मिळत आहे. मी आता बिहारमध्ये पाहतोय की इथे जंगल राजवाला पक्ष भुईसपाट होत आहे. मी देशभर जिथे जातोय, बिहारमध्ये जिथे जिथे आतापर्यंत गेलो आहे त्या प्रत्येक ठिकाणी मला एकच गोष्ट ऐकायला मिळाली, ती म्हणजे ‘फिर एक बार मोदी सरकार’ची घोषणा. माझं सर्व मतदारांना आवाहन आहे की ही निवडणूक म्हणजेच देशाची निवडणूक आहे, आपलं आणि आपल्या देशाचं भविष्य ठरवण्याची निवडणूक आहे, देशाचं नेतृत्व कोण करणार हे ठरवण्याची निवडणूक आहे, ही गोष्ट लक्षात घेऊनच तुम्ही मतदान करा.
हे ही वाचा >> “मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून नाशकात उतरवल्या नऊ बॅगा”, VIDEO शेअर करत संजय राऊत म्हणाले, “त्यामध्ये तब्बल…”
पंतप्रधान मोदी म्हणाले, मला माहिती आहे की आपल्या देशाला काँग्रेसचं कमकुवत, भित्रं आणि अस्थिर सरकार अजिबात नको आहे. आपल्याला आपल्या परिसरात कमकुवत पोलीस किंवा कमकुवत शिक्षक कधीच नको असतो. त्याचप्रमाणे कमकुवत पंतप्रधान निवडून कसं चालेल? आपल्याला आपल्या परिसरातला पोलीस असो, शिक्षक असो किंवा देशाचा पंतप्रधान असो, तो मजबूतच हवा असतो. भित्रा पंतप्रधान कसा चालेल? हे काँग्रेसवाले खूप घाबरलेले आहेत. हे लोक इतके घाबरलेत की यांना रात्री स्वप्नातही पाकिस्तानचा अणूबॉम्ब दिसतो. काँग्रेस सारखे हे पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना रात्री झोपेतही पाकिस्तानचा अणूबॉम्ब दिसतो. या काँग्रेसवाल्या लोकांची, इंडिया आघाडीतल्या नेत्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्ये ऐकली तरी हसू येतं, तसेच हे लोक किती भित्रे आहेत ते समजतं.