आपण लव जिहाद, भू जिहाद याबाबत ऐकलं आहे. मात्र, आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनी व्होट जिहाद करण्याचे आदेश दिले आहेत. हे लोक मुस्लिमांना एकत्र येऊन भाजपाविरोधात व्होट जिहाद करण्यास सांगत आहेत, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केला. ते गुजरातच्या आणंद येथील प्रचारसभेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“काँग्रेस आणि इंडिया आघाडीची रणनीती त्यांच्याच नेत्याने जगापुढे आणली आहे. त्यांनी आता मुस्लिमांना व्होट जिहाद करण्यास सांगितले आहे. आपण आजपर्यंत आपण लव जिहाद, भू जिहाद याबाबत ऐकलं आहे, मात्र, आता व्होट जिहादही करण्यात येत आहे. दुर्दैवं म्हणजे व्होट जिहाद करण्याचे आवाहन एका शिकलेल्या मुस्लीम घराण्यातील नेत्याने केले आहे. या घराण्यातील सदस्य काँग्रेसमध्ये मोठ्या पदावर आहेत”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींची भर सभेतून काँग्रेसला तीन आव्हानं; म्हणाले, “युवराजांमध्ये हिंमत असेल तर…”
“जिहाद म्हणजे काय आणि तो कोणाविरोधात केला जातो, हे सर्वांना माहिती आहे. तरीही इंडिया आघाडीचे नेते मुस्लिमांना एकत्र येऊन व्होट जिहाद करण्यास सांगत आहेत. व्होट जिहाद करा, अस सांगत इंडिया आघाडीने लोकशाहीचा अपमान केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या एकाही नेत्याने याचा विरोध केला नाही, व्होट जिहादचे आवाहन करत काँग्रेसकडून तुष्टीकरणाचे राजकारण केलं जात आहे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, काही दिवासांपूर्वीच पाकिस्तानचे नेते फवाद हुसैन यांनी राहुल गांधी यांचं कौतुक करणारी पोस्ट एक्स या समाजमाध्यमावर केली होती. यावरूनही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. “इकडे काँग्रेस मरत असताना तिकडे पाकिस्तान यांच्यासाठी रडत आहे. पाकिस्तानचे नेते काँग्रेससाठी दुवा करत आहेत. राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तान उतावळा झाला आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.