देशातील मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण द्यायला हवं, असं विधान इंडिया आघाडीचे नेते लालूप्रसाद यादव यांनी केले होते. त्यांच्या विधानानंतर आता भाजपाकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून पंतप्रधान मोदी यांनीही इंडिया आघाडीवर टीका केली आहे. देशात धर्माच्या आधारावर आरक्षण देऊन इंडिया आघाडीला बाबासाहेबांचं संविधान बदलायचं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. ते नगरमधील प्रचारसभेत बोलत होते.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
“मी गेल्या काही दिवसांपासून सांगतो आहे, की काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष या देशात मोठं षडयंत्र रचत आहेत. मात्र, आज इंडिया आघाडीच्या मोठ्या नेत्याने स्वत:च षडयंत्रांवरून पडदा उचलला आहे. बिहारमधील इंडिया आघाडीचे मोठे नेते आणि चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांनी आज जाहीरपणे सांगितले आहे की जर देशात इंडिया आघाडीचे सरकार आले, तर मुस्लिमांना आरक्षण दिले जाईल. याचाच अर्थ इंडिया आघाडी अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याच्या तयारीत आहे”, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
“इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून काही मतांसाठी अशा प्रकारची विधानं केली जात आहेत. जे काम करण्यासाठी बाबासाहेबांनी आणि संपूर्ण संविधान सभेने थांबवलं होतं. ते पाप आता काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते करत आहेत. मुळात संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नाही. त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी आता इंडिया आघाडी संविधान बदलण्याच्या तयारीत आहे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “४ जून ही इंडिया आघाडीची ‘एक्सपायरी डेट’, त्यानंतर…”; नगरमधील सभेत पंतप्रधान मोदींचं विरोधकांवर टीकास्र!
लालूप्रसाद यादव नेमकं काय म्हणाले होते?
लालू प्रसाद यादव यांनी मुस्लीम आरक्षणाबाबत मोठं विधान केलं होते. मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण द्यायला हवं असे ते म्हणाले होते. तसेच “सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे. हे मतदान आमच्या पारड्यात होत असल्यामुळे भाजपा गोंधळली आहे. त्यामुळे ते लोकांची माथी भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदानासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. हे मतदान आमच्या बाजूने होत आहे. त्यामुळेच भाजपावाले घाबरले आहेत. संविधानातील आरक्षणाचं प्रावधान भाजपावाल्यांना नष्ट करायचं आहेच, त्याचबरोबर त्यांना संविधान नष्ट करायचं आहे. मात्र आपली जनता हुशार आहे. त्यांनी भाजपाचा डाव ओळखला आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.