महायुतीच्या नंदुरबारच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वी सॅम पित्रोदा यांनी भारतातील नागरिकांबाबत एक विधान केले होते. भारताच्या दक्षिणेत राहणारी लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात, असे विधान सॅम पित्रोदा यांनी केले होते. त्यानंतर सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता यावरूच पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच राहुल गांधी यांचे एक गुरू अमेरिकेत राहतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“चाहाचं नात आणि जनतेच्या प्रेमाचं कर्ज मी विसरणार नाही. वंचित आणि आदिवासींची सेवा ही माझ्यासाठी कुटुबांची सेवा करण्यासारखी आहे. मी काँग्रेस सारख्या शाही घराण्यातून आलेलो नाही. त्यामुळे मला लोकांच्या समस्या माहीत आहेत. स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही अनेक गावात चांगली घरे, वीज नव्हती. त्यामुळे मी प्रत्येक कुटुंबाला घरे, वीज देण्याचा संकल्प केला होता. आम्ही फक्त नंदुरबारमध्ये सव्वा लाख घरे पीएम योजनेच्या माध्यमातून केले आहेत. तिसऱ्या टर्ममध्ये जे घरापासून वंचित राहिले त्यांनाही घरे देणार आहे. काँग्रेसला कधीही आदिवासी लोकांचे घेणेदेणे नव्हते. गरीबांसाठी अजून खूप काही करणं बाकी आहे”, असं मोदी म्हणाले.
“काँग्रेस खोटं बोलण्याचं काम करत आहे. अफवा पसरवण्यासाठी काँग्रेसने यंत्रणा कामाला लावली आहे. काँग्रेस आरक्षणाबाबतही खोटी माहिती देत आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देणं हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. तुम्ही समजून घ्या हे काँग्रेसवाले मोठं संकट घेऊन आलेले आहे. आपल्या व्होटबँकेला आरक्षण देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण दिले. तेथे जेवढे मुस्लिम होते. त्यांना सर्वांना ओबीसमध्ये घेतले. त्यामुळे जे आरक्षण ओबीसींना मिळत होते, ते आता मुस्लिमांना मिळेल. जोपर्यंत मी जिंवत आहे, तोपर्यंत एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करेल”, असे मोदी म्हणाले .
मोदींची राहुल गांधींवर टीका
“काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे एक गुरु अमेरिकेत राहतात. त्यांनी भारतातील लोकांवर त्यांच्या रंगावरुन टीका केली. अशा प्रकारे रंगावरून भेदभाव करणं योग्य आहे का? सावळ्या रंगाच्या लोकांना आफ्रिकनसारखे दिसतात असे ते म्हणत असतील तर हा अपमान आहे. काँग्रेस पक्षाचा अजेंडा एवढा खतरनाक आहे की, राहुल गांधी यांच्या गुरूने याचाही खुलासा केला. मी मंदिरात गेलो तरी काँग्रेसची पोटदुखी होते”, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.