कर्नाटक विधानसभा निवडणूक केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेची केली. या निवडणुकीत भाजपाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपासून अनेक मंत्री आणि मुख्यमंत्री कर्नाटकात तळ ठोकून होते. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचारासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींपासून काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते होते. अखेर शनिवारी (१३) या चुरशीच्या लढतीचा निकाल लागला. यात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीट करत आपली भावना व्यक्त केली.
नरेंद्र मोदी म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी काँग्रेस पक्षाचं अभिनंदन. जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना सदिच्छा देतो.”
“भाजपा कार्यकर्त्यांनी निवडणुकीत केलेल्या कष्टाचं कौतुक”
मोदींनी आणखी एक ट्वीट करत कार्यकर्त्यांनाही संबोधित केलं. “कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांना धन्यवाद. भाजपा कार्यकर्त्यांनी निवडणुकीत केलेल्या कष्टाचं मी कौतुक करतो. आम्ही आगामी काळात कर्नाटकच्या जनतेची अधिक जोमाने सेवा करू,” असं मोदींनी नमूद केलं.
कर्नाटक विधानसभा निकालानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया
कर्नाटक विधानसभा निकालानंतर राहुल गांधी म्हणाले, “मी सर्वात आधी कर्नाटकच्या जनतेला, काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचं अभिनंदन करतो. कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला भांडवलशाहीची ताकद होती आणि दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. या गरीब जनतेच्या शक्तीने भांडवलशाहीचा पराभव केला. हेच प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस कर्नाटकात गरीबांबरोबर उभा राहिला. आम्ही गरीबांच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो.”
“कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झालाय”
“मला सगळ्यात जास्त ही गोष्ट आवडली की आम्ही द्वेषाने, चुकीच्या शब्दांनी ही लढाई नाही लढली. आम्ही प्रेमाने ही लढाई लढलो. कर्नाटकच्या जनतेनं आम्हाला हे दाखवलं की प्रेम या देशाला हवंसं वाटतंय. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं उघडली गेली आहेत. हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे,” असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.
“आम्ही पहिल्या दिवशी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आश्वासनं पूर्ण करू”
“आम्ही कर्नाटकच्या गरीब जनतेला पाच आश्वासनं दिली होती. आम्ही ही आश्वासनं पहिल्या दिवशी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू,” असंही त्यांनी नमूद केलं.