PM Narendra Modi : दिल्लीमध्ये भाजपाचा विजय झाला आहे. २७ वर्षांनी दिल्लीमध्ये कमळ फुललं आहे. भाजपाने आपला धोबीपछाड दिला आहे. काँग्रेसला या निवडणुकीत १ आमदार ही संख्याही गाठता आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीत भाजपाला स्पष्ट बहुमत
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. एकीकडे आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावला जात होता तर दुसरीकडे भाजपाकडून दिल्लीतील २५ वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता. काँग्रेस आणि आप यांच्यात न झालेल्या युतीचा भाजपाला फायदा होईल असं मानलं जात होतं. तेच निकालांमध्ये घडलं आहे. ८ फेब्रुवारीला लागलेल्या निकालांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दरम्यान आप आणि काँग्रेस यांच्यातलं भांडण भाजपाचा फायदा करणारं ठरलं आहे यात शंकाच नाही.
काय म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी?
जनशक्ती सर्वेपरि! विकास, सुशासन यांचा विजय झाला आहे. दिल्लीच्या सगळ्या भावा-बहिणींना मी वंदन करतो आहे. आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. दिल्लीचा चौफेर विकास केला जाईल यात शंकाच नाही. दिल्लीकरांचं आयुष्य उत्तम होईल, यासाठी आम्ही कुठलीही कसर सोडणार नाही. विकसित भारताच्या निर्मितीत दिल्लीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मला भाजपाच्या कार्यकर्त्यांवरही गर्व आहे ज्यांनी हा विजय मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. दिल्लीकरांची सेवा करण्यासाठी आम्ही आता अधिक बळकटीने काम करु अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद३ मोदी यांनी केली आहे. दिल्लीकरांनी जे मतदान केलं त्याबद्दल त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानले आहे.
अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया काय?
दिल्लीतील सत्ता हातून निसटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की विजय उमेदवार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. गेल्या १० वर्षांत जनतेसाठी केलेले काम त्यांच्यासमोर आहे. जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतोय. आम्ही आता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो नाहीय, असंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच या निवडणुकांमध्ये उत्तम काम केल्याबद्दल मी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.