PM Narendra Modi Speech: भारतातल्या जनतेने दाखवलेलं प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद यासाठी मी सगळ्या देशाचा ऋणी आहे. आज मंगल दिवस आहे. या पावन दिवशी एनडीएचा सलग तिसऱ्यांदा विजय झाला आहे आणि आम्ही सरकार स्थापन करणार आहोत हे निश्चित झालं आहे. आम्ही सगळेजण जनता जनार्दनाचे आभार मानतो. देशाने भाजपावर, एनडीएवर विश्वास दाखवला आहे. आजचा हा विजय जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांचे आभार मानले आहेत.
आजचा विजय हा १४० भारतीयांचा विजय
आजचा विजय विकसित भारताच्या संकल्पनेचा विजय आहे. सबका साथ, सबका विकास या मंत्राचा हा विजय आहे, आज झालेला विजय १४० कोटी भारतीयांचा विजय आहे. मी आज देशाच्या निवडणूक आयोगाचेही आभार मानतो. निवडणूक आयोगाने जगातली सर्वात मोठी निवडणूक संपन्न केली. १०० कोटी मतदार, ११ लाख पोलिंग बूथ, दीड कोटी मतदान कर्मचारी, ५५ लाख व्होटिंग मशीन्स इतकी तयारी होती. तसंच प्रचंड उन्हात आपलं कर्तव्य प्रत्येकाने पाळलं. आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांचं कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावलं. भारतातली निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणा यांच्या विश्वासार्हतेवर प्रत्येक भारतीयाला गर्व आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
निवडणूक प्रक्रिया ही अभिमानास्पद प्रक्रिया
अशा प्रकारे निवडणूक होण्याचं उदाहरण जगात कुठेही नाही. मी सगळ्यांना आज सांगू इच्छितो, देशाच्या लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया ही एक ताकद आहे. ही प्रक्रिया एक गौरवशाली परंपरा आहे. मी सगळ्यांना आग्रहाने सांगू इच्छितो की देशाची ही परंपरा जगात पोहचवा. यावेळी भारतात ज्या मतदारांनी मतदान केलं ते लोकशाही मानणाऱ्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. जम्मू काश्मीरच्या मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. भारताची बदनामी करणाऱ्यांना त्यांनी आरसा दाखवला आहे. या विजयी पर्वाच्या निमित्ताने मी सगळ्यांना आदराने नमस्कार करतो. देशातल्या सगळ्या पक्षांचं, उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. लोकशाहीचं हे विराट यश आज आपल्याला दिसतं आहे त्यात सगळेच सहभागी होते. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
१९६२ पहिल्यांदा देशात तिसऱ्यांदा एका पक्षाचं सरकार आलं आहे
आज जो जनादेश मिळाला आहे त्याचे काही पैलू आहेत. १९६२ च्या नंतर पहिल्यांदा एक सरकार असं आलं आहे जे तिसऱ्यांदा परतलं आहे. दोन कार्यकाळ यशस्वी करुन हे सरकार परत आलं आहे. राज्यांमध्ये ज्या ठिकाणी विधानसभा निवडणूक झाली तिथेही एनडीएला भव्य विजय मिळाला. अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश किंवा सिक्कीम असो या राज्यांमध्ये काँग्रेसचा सूपडा साफ झाला आहे. माझ्याकडे सगळे तपशील नाही पण अनेकांचं डिपॉझिट जप्त झालं आहे हे मला ठाऊक आहेत. भाजपाचं ओदिशामध्ये सरकार स्थापन करणार आहे. पहिल्यांदाच प्रभू जगन्नाथाच्या भूमित भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. केरळमध्येही आमच्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं आहे. कैक पिढ्यांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. तेलंगणमध्ये आपली संख्या डबल डिजिट झाली आहे. हिमाचल, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड या काही राज्यांमध्ये आपल्या पक्षाने क्लिन स्वीप केलं आहे. मी या सगळ्या राज्यांचेही आभार मानतो असंही मोदी यांनी म्हटलं आहे.
माझी आई देवाघरी गेल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. पण देशाच्या माता, भगिनींनी मला आईची कमतरता भासू दिली नाही. मला त्यांच्याकडून हे प्रेम मिळालं. हे सगळं मतदानाच्या संख्येत दिसत नाही. मी जे अनुभवलं आहे ते अनुभव रोमांच उभे करणारे आहेत. राष्ट्र प्रथम ची भावना ही आपल्यासाठी महत्वाची आहे.