पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या माध्यम समूहांना मोदी मुलाखतीही देत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून पुढील निवडणुकीत उत्तर-दक्षिण असा थेट फरक दिसेल आणि त्यातून उत्तर व दक्षिण भारत असं राजकीय विभाजन भाजपाकडून केलं जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
विरोधकांकडून उत्तर-दक्षिण असं विभाजन केलं जात असल्याची टीका होत असल्याबाबत मोदींना विचारणा केली असता मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. “त्यांच्या गैरकारभार व भ्रष्टाचारावरून लक्ष विचलित करण्यासाठी असे खोटे आरोप करणं ही त्यांची पद्धत आहे. काँग्रेसला खरंच असं वाटतं की भारताचं आणखी विभाजन करण्याचा त्यांचा कुटिल डाव जनता स्वीकारेल? प्रत्येक देशभक्त भारतीय काँग्रेसचा हा दावा फेटाळून लावेल”, असं मोदी म्हणाले.
“डाव्यांसोबत मिळून काँग्रेसनं केरळला जवळपास दिवाळखोर केलं आहे. आता तेलंगणा व कर्नाटकात तेच करण्याचा त्यांचा डाव आहे. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येऊन फक्त एक वर्ष झालंय आणि त्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान करून ठेवलंय. राज्य सरकारवरचं कर्ज मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. त्यांची पोकळ आश्वासनं हवेत विरली आहेत”, असा दावा मोदींनी केला.
भाजपाची दक्षिण भारतातील कामगिरी कशी असेल?
दरम्यान, उत्तर भारत हेच भाजपाचं प्रभावक्षेत्र समजलं जात असून दक्षिण भारतात भाजपाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यासंदर्भात विचारणा केली असता मोदींनी यावेळी वेगळे निकाल लागतील असा दावा केला आहे. “भाजपाला दक्षिण भारतात यावेळी खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण भारतातील लोकांनी फक्त काँग्रेस आणि स्थानिक पक्षांची सरकारं पाहिली आहेत. या पक्षांनी भ्रष्टाचार, घराणेशाही, गैरप्रशासन, व्होटबँक पॉलिटिक्स अशा गोष्टी केल्याचं जनतेनं पाहिलं आहे. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांचा तिरस्कारही जनतेनं पाहिला आहे. त्यामुळे लोक या गोष्टींना वैतागले आहेत”, असं मोदी म्हणाले.
“यंदा दक्षिण भारतातील निकाल अनेक समजुतींना तडा देणारे ठरतील. आम्ही लोकांच्या मनावर विजय मिळवला आहे. आता हेच आमच्या मतांच्या प्रमाणात आणि जिंकलेल्या जागांमध्ये परावर्तित झालेलं असेल”, असा दावाही मोदींनी यावेळी केला.