भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीसह उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी सक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदासाठी कोणाचेही नाव जाहीर केले नाही. इंडिया आघाडीवाले हे पंतप्रधान पदासाठी संगीत खुर्चीचा खेळ खेळून पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शाहिस्तेखानावर करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्जिकल स्ट्राईक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या ठिकाणी आले आहेत. पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा आज होत आहे. आपल्या मुंबईत अरबी समुद्र आहे, पण जनतेचा समुद्र आज पुण्यात पाहायला मिळत आहे. ही निवडणूक कशाची आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ही निवडणूक पंचायत समितीची नाही. ही निवडणूक आपल्या देशाचा नेता ठरवण्याची निवडणूक आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आपल्या महायुतीचे इंजिन नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्याबरोबर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे, रासप, रयत क्रांती अशा विविध पक्षांची मिळून आपली महायुती आहे. या महायुतीचे इंजिन हे पॉवरफुल आहे. आपल्या गाडीत ओबीसी, अल्पसंख्याक, शेतकरी, शेतमजूर अशा सर्वांना बसण्यासाठी जागा आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला काय अवस्था आहे. त्यांच्याकडे फक्त इंजिन आहे, डब्बे नाहीत. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे”, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
फडणवीस पुढे म्हणाले, “इंडिया आघाडीकडे सर्व सामान्य माणसांना बसण्यासाठी डब्बे नाहीत. राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासाठीच जागा आहे. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांच्यासाठी जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे. विरोधकांची आज काय परिस्थिती आहे? विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? हे देखील माहित नाही. ते म्हणतात, आम्ही आळीपाळीने पंतप्रधान बनवणार आहोत. मग पहिलं पंतप्रधान कोण होणार ते सांगा. आता ते म्हणतील आम्ही संगीत खुर्ची खेळू. एक खुर्ची ठेवू, त्या खुर्ची भोवती सर्व नेते फिरतील, मग ज्याचा नंबर येईल तो नेता खुर्चीवर बसेल. मग तो आऊट, त्यानंतर पुन्हा ते खुर्चीच्या भोवती फिरतील, त्यानंतर दुसरा नेता, असे पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवण्याचा विचार विरोधकांच्या मनामध्ये आहे. मात्र, त्यांचे हे इरादे भारतातील जनता कधीच पूर्ण होऊ देणार नाही”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.