सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह काँग्रेसकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अलीकडेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना विषारी सापाशी केली होती. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
दरम्यान, कर्नाटकमधील कोलार येथील प्रचारसभेतून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मी भ्रष्टाचाराला विरोध करतो, म्हणून काँग्रेसकडून माझ्यावर टीकेची झोड उठवली जाते, असं वक्तव्य मोदी यांनी केलं. तसेच ईश्वररुपी जनतेच्या गळ्यातील साप बनणं मला मंजूर आहे, असंही मोदी म्हणाले.
कोलार जिल्ह्यातील प्रचारसभेत मोदी म्हणाले, “आज मी भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे, याचा सर्वात जास्त त्रास काँग्रेसला होत आहे. त्यामुळे काँग्रेसचा माझ्याबाबत तिरस्कार आणखी वाढत आहे. त्यांनी माझ्यावर टीकेची झोड उठवली आहे. आजकाल काँग्रेसचे लोक मला धमकी देत आहेत, ते म्हणत आहेत की, मोदी तुझी कबर खोदली जाईल. कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वात मोठा मुद्दा ‘साप’ आहे. ते माझी सापाशी तुलना करत आहेत आणि लोकांकडे मतं मागत आहेत. पण साप हा भगवान शंकराच्या गळ्यातील शोभनीय बाब आहेय माझ्यासाठी देशातील जनता देवाचं रुप आहे, ते शंकाराचंच स्वरुप आहे. त्यामुळे ईश्वररुपी जनतेच्या गळ्यातील साप बनणं मला मंजूर आहे. पण मला माहीत आहे, कर्नाटकमधील जनता शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसला १० मे रोजी मतपेटीतून उत्तर देईल.”
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्यांना विषारी समजा किंवा समजू नका. पण या विषामुळे तुम्ही मरुन जाल. मोदी हे काय चांगले व्यक्ती आहेत का? तर तसं अजिबात नाही. तुम्ही त्यांना चांगलं समजत असाल आणि त्यांच्या जवळ जाल तर अशी निद्रा निजाल की पुन्हा तुम्हाला जाग येणार नाही.
मल्लिकार्जुन खरगेंनी दिलं स्पष्टीकरण
मल्लिकार्जुन खरगेंवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी जे वक्तव्य केलं ते व्यक्तीगत नव्हतं माझं म्हणणं होतं की मोदींची विचारधारा विषारी सापासारखी आहे. ही विचारधारा तुम्ही चाटायला गेलात तर तुमचा मृत्यू निश्चित आहे, असं मला म्हणायचं होतं, असं स्पष्टीकरण आता खरगे यांनी दिलं आहे.