पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी २६ एप्रिल रोजी मतदान होत असलेल्या मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या. हिंगोली, नांदेड लोकसभेच्या प्रचार सभेनंतर त्यांनी परभणी लोकसभेत प्रचार सभा घेतली. परभणीमध्ये महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत. “महादेव जानकर हे माझे लहान भाऊ आहेत. त्यांना तुम्ही लोकसभेत पाठविणार की नाही?”, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना विचारला. तसेच मोदी यांनी आपल्या खिशातून शिटी काढून महादेव जानकर यांच्या हातात दिली. जानकर हे रासपच्या शिटी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मोदींनी ही प्रतिकात्मक भेट त्यांना दिली. यानंतर जानकर यांनी मंचावरच ही शिटी फुंकली.
“जानकर म्हणजे राज्याच्या तिजोरीची किल्ली, लवकरच दिल्लीचीही…”, फडणवीसांचं मोदींसमोरच विधान; म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, आमच्या सरकारच्या धोरणांमुळे परभणीतील १२ लाख लोकांना मोफत रेशन मिळत आहे. या कुटुंबातील कुणालाही उपाशी झोपावं लागत नाही. पुढील पाच वर्षातही असेच मोफत रेशन मिळत राहिल. तसेच परभणीत १७ जनऔषधी केंद्रातून औषधांवर ८० टक्के सूट मिळत आहेत. सव्वा लाखाहून अधिक महिलांना उज्ज्वला गॅस जोडणी देण्यात आली आहे. परभणीत ७५ टक्क्यांहून अधिक घरातून नळाद्वारे पाणी देण्यात येत आहे. परभणीतील नऊ लाखाहून अधिक जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. कोणतेही सरकार हे काम तेव्हाच करू शकते, जेव्हा ते गरीबांप्रती संवेदनशील असते.
काँग्रेसने निजामाप्रमाणेच मराठवाड्याचा विकास होऊ दिला नाही
“काँग्रेस अशी वेल आहे, ज्याचे स्वतःचे मूळ आणि जमीन नाही. या वेलीला जो आधार देतो, त्यालाच ती संपवते. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची फाळणी केली, काश्मीरचा प्रश्न पेटवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू होऊ दिले नाही. तिथल्या दलितांना इतके वर्ष अधिकारच मिळू दिले नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार असताना मराठवाड्यातून निजामांचे राज्य केले आहे, याची जाणीवच त्यांनी करू दिली नाही. निजामासारखीच मानसिकता ठेवून त्यांनी मराठवाड्याचा विकास होऊ दिला नाही”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
मतदारसंघ आढावा : परभणी… जातीय समीकरणांची आकडेमोड आणि फेरमांडणी
रझाकारांची मानसिकता असलेल्या लोकांना मराठवड्यात स्थान देऊ नका, असेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.