लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्यामुळे मुंबईत प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत बुधवारी (१५ मे) सायंकाळी रोड-शो होणार आहे. त्यांच्या या रोड शोची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या माध्यमातून भाजपा जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. भाजपाच्या मुंबईतील उमेदवारांसाठी हा रोड शो असणार आहे. त्यामुळे या रोड शोच्या माध्यमातून भाजपाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. या रोड शो ला भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी कल्याणमध्ये जाहीर सभा होणार आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात सायंकाळी चारनंतर मोदींच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

पंतप्रधान मोदींचा रोड शो कसा असेल?

पंतप्रधान मोदी यांचा रोड शो विक्रोळी येथील अशोक सिल्क मिल्कपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर त्रेयस टॉकिज, सर्वोदय सिग्नल, सीआईडी ऑफिस, सांघवी स्कवेर, हवेली ब्रिज आणि पार्श्वनाथ चौक येथे रोड शो संपणार आहे. हा रोड शो बुधवारी सांयकाळी ४ वाजून ३० मीनिटांनी सुरु होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या रोड शो मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘मराठा बांधवांच्या रोषामुळे बीडची प्रचारसभा टाळली?’ देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. त्यामुळे या शेवटच्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे आणि पालघर या मतदारसंघात या पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. २० मे रोजी मतदान असल्यामुळे १८ मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्यामुळे प्रचारासाठी फक्त तीनच दिवस बाकी राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे.

कल्याणमध्ये नरेंद्र मोदींची सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याणमधूल लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या सभा असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतून काय बोलतात? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्यामुळे प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन या दरम्यानच्या वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती आहे.